बांधलेल्या कचराकुंड्या गायब

चाणजे ग्रामपंचायतीचे लाखो रुपये वाया

| उरण | वार्ताहर |

चाणजे ग्रामपंचायतने काही महिन्यांपूर्वी लाखों रुपये खर्च करून अनेक ठिकाणी कचरा कुंड्या उभारल्या होत्या. त्यातील काही कचराकुंड्या गायब होऊन त्याठिकाणी वृक्षलागवड करण्यात आली. यावरून ग्रामपंचायतीचे लाखो रुपये पाण्यात गेल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. याला जबाबदार कोण? याचे उत्तर ग्रामसेवक यांनी जनतेला द्यावे, अशी मागणी चाणजे ग्रामस्थांकडून केली जात आहे.

उरण तालुक्यातील चाणजे ग्रामपंचायतीमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. त्याबद्दल अनेक तक्रारी अर्ज दाखल होऊनही आजतागायत कोणतीच कारवाई अथवा चौकशी करण्याऐवजी तक्रारी अर्ज निकाली काढण्याचे प्रताप अधिकाऱ्यांना केल्याची चर्चा आहे. यामुळे एका ग्रामविकास अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आल्याचे कळते. त्यांचे निलंबन रद्द करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी चर्चा आहे. यावरून शेतच कुंपणच खात असेल तर दाद कुणाकडे मागायचे, असा सवाल उपस्थित होतो.

करंजा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून लाखो रुपये खर्च करून अनेक ठिकाणी विकासकामे केल्याचा डांगोरा पिटला जातो. परंतु, माहितीच्या अधिकारात त्याची माहिती मागितली असता माहिती दिली जात नसल्याचे तक्रारदार सांगतात. काही महिन्यांपूर्वी अनेक ठिकाणी लाखो रुपये खर्च करून कचऱ्याकुंड्या बांधण्यात आल्या होत्या. त्यातील काही कचराकुंड्या गायब झाल्या आहेत.

कचराकुंड्या उभारताना कोणतीही अधिकृत परवानगी न घेता शासकीय जागेवर कचराकुंड्या उभारल्याचे बोलले जाते. जर अशा प्रकारे लाखों रुपये खर्च करून उभारलेल्या कचराकुंड्या गायब होऊन हा पैसा वाया गेला याला जबाबदार कोण, याबाबत विचारणा केली असता ग्रामविकास अधिकारी अथवा इतर वरिष्ठ अधिकारी माहिती देण्याऐवजी चौकशी सुरू असल्याचे सांगून वेळ मारून नेतात. तरी जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची हिंमत दाखवतील का, असा सवाल करंजा ग्रामस्थांकडून केला जात आहे.

Exit mobile version