शॉक लागून बैलाचा मृत्यू

| तळा | प्रतिनिधी |
शेतात चरायला गेलेल्या बैलाला तुटलेल्या विजेच्या तारेचा शॉक लागून बैलाचा मृत्यू झाल्याची घटना तळा तालुक्यातील वाशी येथे घडली. वाशी परिसरात ही तार तुटून खाली पडली होती. ती वीज कर्मचाऱ्याने दुरुस्त करून दिली. मात्र दुरुस्त करण्यापूर्वीच या वाहिनीतील वीजप्रवाहाचा धक्का लागून चरायला गेलेल्या बैलाचा मृत्यू झाला. हे वीज कर्मचाऱ्याला माहित असून सुद्धा त्याने त्याबतची कोणतीच कल्पना कार्यालयात किंवा गावात दिली नाही.

जेव्हा वाशी येथील शेतकरी रमेश पांडुरंग टेमकर चरायला सोडलेल्या बैलाला आणण्यासाठी गेले असता त्यांना बैल मृत झाल्याचे लक्षात आले. शेतीच्या हंगामात बैल दगावल्याने टेमकर हतबल झाले आहेत. महावितरणाच्या गलथान कारभारामुळे हा प्रसंग ओढवला असून भरपाई मिळावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

याबाबत पशुधन अधिकारी आणि तलाठी यांना कळविण्यात आले असून, पंचनामा करण्यात येणार आहे. यासंदर्भात महावितरणचे उपभियंता महेंद्रकर यांच्याकडे संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, वाशी गावात घडलेली घटना दुर्दैवी आहे. संबंधित घटनेचा पंचनामा करण्यात आला असून वरिष्ठांना त्याबाबत कळविले आहे. शेतकऱ्याला योग्य ती नुकसानभरपाई देण्यात येईल.

Exit mobile version