बारशिव खिंडीतील घटना
। कोर्लई । प्रतिनिधी ।
मुरुड-साळाव रस्त्यावर मजगाव ते नांदगाव दरम्यान शाळेतील काही विद्यार्थ्यांनींना चाकू दाखवून अनुचित प्रकार करुन पळताना बुलेटस्वाराचा अपघात झाला. यात तो गंभीर जखमी झाला आहे. हा घटना दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास बारशिव खिंडीत घडली. श्रीवर्धन तालुक्यातील दिघी-सर्वा येथील कल्पेश देवधरे (37) असे या माथेफिरू बुलेटस्वाराचे नाव आहे.
मुरुड तालुक्यातील बारशिव गावाजवळ हा अनुचित प्रकार घडला. या माथेफिरू इसमाने नांदगाव शाळेतील काही मुलींसमोर चाकू दाखवून विनयभंग करून अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्या मुलींनी त्यावेळी आरडाओरड करून आजूबाजूच्या रहिवाशांना सावध केले. त्याचक्षणी तेथे असलेल्या काही मुलांनी मोटरसायकलने त्याचा पाठलाग केला. दरम्यान बारशिव खिंडीतील वळणावर भरधाव वेगाने जाणाऱ्या बुलेटचे नियंत्रण सुटले आणि मुरुडकडे जाणाऱ्या एका एसटी बसला बुलेटची धडक बसली. यात बुलेटस्वार गंभीर जखमी झाला आहे.
या घटनेची माहिती मिळताच रेवदंडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी बुलेटस्वाराला बोर्ली मांडला प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र, तो गंभीर जखमी असल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात व तेथून मुंबईला हलविण्यात आले. याबाबत पुढील तपास रेवदंडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्रीकांत किरवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शिला ठाकूर करीत आहेत.







