महाजनेत रंगला बैलगाडा शर्यतीचा थरार

गोंडेकर बंधूचा बैलजोड ठरला विजेता

। अलिबाग । प्रतिनिधी ।

अलिबाग तालुक्यातील महाजने ग्रामस्थ मंडळ आणि हौशी बैलगाडी मित्रंडळाच्यावतीने महाजने येथील माती बंदरामध्ये बैलगाडी शर्यतीचे आयोजन रविवारी (दि.22) करण्यात आले होते. या स्पर्धेत रेवदंडा येथील गोंडेकर बंधूच्या बैलजोडीने फायनलच्या गटात प्रथम क्रमांक मिळवला आहे. यावेळी, बैलगाडा मालक गोंडेकर यांना आकर्षक बक्षीस देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी या बैलगाडा शर्यतीच्या थराराचा आनंद हजारो बैलगाडा हौशींनी घेतला.


या माती बंदरातील बैलगाडा शर्यतीमध्ये एकूण 21 गट तयार करण्यात आले होते. त्यात 3 गट घोडागाडी व 18 गट बैलगाडीचे तयार करण्यात आले होते. या स्पर्धेत एकूण 103 बैलजोडींनी सहभाग घेतला होता. जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातील बैलगाडा मालक, चालकांसह बैलगाडा हौशींनी हजारोच्या संख्येने सहभाग घेतला होता. या स्पर्धेला दुपारी तीननंतर सुरुवात झाली. यावेळी, आपला बैलगाडा प्रथम आणण्यासाठी गाडी चालक शर्थीचे प्रयत्न करीत होते. अखेर पंधराव्या म्हणजे फायनलच्या गटाचा बैलगाडा शर्यतीचा सामना रंगला. हा थरार पाहण्यासाठी बैलगाडा हौशींची अलोट गर्दी झाली होती. या गटात रेवदंडा येथील गोंडेकर बंधू, गोळबादेवी येथील अनुज पाटील, परहूरपाडा येथील दत्ताराम गुंजाळ यांच्या बैलगाडी जोडीने अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला आहे.


या शर्यतीतील प्रत्येक गटातील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना आकर्षक बक्षीस ठेवण्यात आले होते. शर्यतीदरम्यान, पहिल्या गटापासून पंधरा गटापर्यंतच्या बैलगाडा, घोडागाडी शर्यतीचा आनंद प्रेक्षकांनी मनमुरादपणे लुटला. यावेळी महाजने ग्रामस्थ, हौशी बैलगाडी मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

Exit mobile version