। नेरळ । वार्ताहर ।
सर्वोच्य न्यायालयाने बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. बैलगाडी शर्यतीला परवानगी देण्याच्या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी कर्जत तालुक्यातील शेलू येथील मैदानावर जल्लोष करण्यात आला.यावेळी आनंद उत्सव साजरा करण्यासाठी प्रायोगिक तत्वावर शर्यत करण्यात आली.
प्राणीमित्र संघटना यांच्याकडून पेटा कायद्याची अंमलबजावणी करण्याची मागणी झाल्यानंतर राज्य सरकारने बैलगाडा शर्यतीवर बंदी आणली होती. त्यानंतर पर्यावरणप्रेमींकडून सर्वोच्य न्यायालयात आव्हान देण्यात आल्याने बैलगाडा शर्यती बंद झाल्या होत्या
मात्र सर्वोच्य न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवर 16 डिसेंबर रोजी बंदी उठवण्याचा निर्णय जाहीर केला. या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत करण्यासाठी महाराष्ट्र बैलगाडा असोसिएशनने कर्जत येथे जल्लोष सोहळा आयोजित केला होता.त्यासाठी 17 डिसेंबर रोजी कर्जत तालुक्यातील शेलू येथील बैलगाडा शर्यत मैदानावर सर्व शेतकरी आणि बैलगाडा मालक यांनी जमावे असे आवाहन संघटनेचे राज्य अध्यक्ष पंढरीनाथ फडके यांनी केले होते.
रायगड, ठाणे, नगर, नाशिक आणि पुणे जिल्ह्यातील बैलगाडा मालक यांनी शेलू येथील बैलगाडा शर्यत मैदानावर दुपारी गर्दी केली होती. बैलगाडा शर्यत संघटनेचे अध्यक्ष फडके हे स्वतः बैलगाडीवर बसून मैदानावर पोहचले. यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी भगवान चंचे,नारायण डामसे,राहुल पाटील,विजय म्हसकर,भगवान खडे,पपू बार्शी असे अनेक पदाधिकारी यांनी गाण्यांच्या ठेक्यावर ताल धरत नाचण्यास सुरुवात केली.