कुटुंबातील एकाची मानवाधिकार आयोगाकडे तक्रार
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील वैजनाथ येथील एका कुटुंबाच्या सामायिक जमिनीमध्ये न्यायालयाचे कोणतेही आदेश नसताना कर्जत पोलिसांनी एकतर्फी कारवाई केल्याचा दावा केला आहे. त्यामुळे त्या पीडित कुटुंबातील अनिता गुरव थेट राज्य मानवाधिकार आयोगाकडे तक्रार केली असून, न्यायाची अपेक्षा व्यक्त केली आहे.
रायगड जिल्ह्यातील आमची वडिलोपार्जित जमीन मिळकत आहे. त्या कुटुंबातील व्यक्तीच्या हिश्श्यास 101/1, 102/2 अशा जमीन मिळकती आलेल्या आहेत. त्यातील दिलीप गुरव यांच्या हिश्श्यास 101/2 अशी जमीन मिळकत देण्यात आली आहे. त्यामध्ये जाण्यासाठी पूर्वपार वहिवाटीचा रस्ता आहे. तो तसाच कायमस्वरूपी ये-जा करण्यासाठी देण्यात आला. तर, हिश्श्यास देण्यात आलेल्या जमीन मिळकतीमध्ये आम्ही शेतघर बांधले आहे. सदर शेतघरामध्ये आमचे संपूर्ण कुटुंब राहात आहे. मात्र, भाऊ दिलीप गुरव याने जुना आमचा ये-जा करण्यासाठी जो वहिवाटीचा रस्ता दिलेला, तो बंद करून नवीन रस्ता तयार केला. त्यामुळे सदरचा एकमेव रस्ता आम्हाला शेतघरामध्ये ये-जा करण्यासाठी वापर करीत आहोत. अशी वस्तुस्थिती असताना आता भाऊ दिलीप गुरव हे आपल्या कुटुंबातील अन्य व्यक्तींची अडवणूक करीत आहेत. रस्त्यासाठी जमीन देण्यासाठी विरोध केला असता त्यांच्याविरुद्ध खोटी तक्रार कर्जत पोलीस ठाण्यात केली, असा दावा अनिता गुरव यांनी केला आहे. वास्तविक, आमच्या शेतजमिनीत आणि शेतघरात जाण्यासाठी एकमेव असलेल्या रस्त्याचा वापर करण्यास दिलीप गुरव आडकाठी करीत आहेत. हा आपल्या कुटुंबावर अन्याय झालेला असताना, कर्जत पोलीस दमदाटी करतात तसेच, आमची तक्रारसुद्धा घेत नाही आणि दिलीप गुरव यांना रस्ता बंद करण्यास मदत करीत आहेत, असा आरोप करण्यात आला आहे. या अन्यायाविरुद्ध राज्य मानवाधिकार आयोग यांच्याकडे तक्रार केली आहे.
कर्जत पोलिसांच्या मदतीने व सहकार्याने तसेच पोलिसांच्या उपस्थितीत दिलीप गुरव व त्याच्या मुलाने आमचा वहिवाटीचा रस्ता बेकायदेशीररित्या उखडून बंद केला आहे. याबाबत दिलीप गुरव, त्याचा मुलगा यांनी कोर्टाची तसेच इतर कुणाची परवानगी नसतानादेखील पोलिसांच्या उपस्थितीत रस्ता उद्ध्वस्त केला. त्यामुळे जर आठ दिवसांत कर्जत पोलिसांच्या दादागिरीबाबत तसेच त्यांच्यावर काय कारवाई झाली नाही, तर ते शेतकरी अनिता गुरव या आपल्या कुटुंबासह कर्जत पोलिसांच्याविरुद्ध आमरण उपोषणास बसणार आहेत.







