शेडुंग टोलनाक्यावरील कर्मचार्‍यांची दादागिरी

| पनवेल | प्रतिनिधी |

खोपोली येथून पनवेलला आपल्या वडिलांना हॉस्पिटलमधून घेऊन जात असलेल्या आदिवासी तरुणाचा फास्टट्रॅगमधील बॅलन्स संपल्याने टोलची पावती घेऊनदेखील त्याला मारहाण करण्यात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी राकेश पिंगळे (रा. घोडिवली-खालापूर) याच्यासह टोलनाक्यावर काम करणार्‍या इतर पाच ते सहा जणांविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

शेडुंग टोलनाका वसुलीचा अड्डा बनला असून, टोलनाक्यावरील फास्टट्रॅग यंत्रणेत अनेक वेळा त्रुटी आढळतात. स्कॅनरमध्ये त्रुटी असल्याने फास्टट्रॅग स्कॅन होत नाही. त्यामुळे दररोज ट्रॅफिक जाम होते. वाहनांच्या दोन ते तीन कि.मी.च्या रांगा लागतात. तरीही टोलवसुली सुरूच असते. शासनाचे सर्व नियम पादळी तुडवण्यात शेडूंग टोलनाक्यावरील कर्मचारी अग्रेसर असतात. वाहतूक कोंडीची तक्रार केल्यास प्रवाशांना उडवाउडवीची उत्तरे दिली जातात व दमदाटी केली जात असल्याचे समोर आले आहे.

मंथन शीद हा विहारी ठाकूरवाडी, खोपोली येथे राहात असून, 24 जून रोजी तो वडील जयवंत शीद यांना घेऊन कामोठे येथे बी.एन.जे. हॉस्पिटल येथे जात होता. दुपारी पावणे चारच्या सुमारास मारुती सुझुकी एक्सेल कार क्रमांक एमएच 46 बीव्ही 8976 शेडूंग टोल नाका येथे आली. यावेळी टोल भरण्यासाठी झालेल्या वादातून राकेश पिंगळे आणि त्याच्यासह टोलनाक्यावर काम करणार्‍या पाच ते सहा जणांनी जयवंत शिद आणि मंथन शिद यांना शिवीगाळ केली व दोघांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यामध्ये मंथन शिद याच्या हाताला गंभीर दुखापती करून पुन्हा टोलनाक्यावर आल्यास खल्लास करीन, अशी धमकी दिली. याप्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Exit mobile version