लोकसभेच्या जागेवर राष्ट्रवादीचा दावा; धैर्यशील पाटलांना ‘दिल्ली अभी दूर है’
| रायगड | आविष्कार देसाई |
म्हसळा येथील एका कार्यक्रमात दस्तुरखुद्द अजित पवार यांनी रायगड लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडेच राहील, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असणारे भाजपाचे धैयशील पाटील यांच्यासाठी ‘दिल्ली अभी दूर है’ असे चित्र आहे. तिकीट वाटपावरुन महायुतीमधील वाद आता चांगलाच विकोपाला गेला आहे. महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेला हा संभ्रम इंडिया आघाडीच्या पथ्यावर पडणार आहे.
लोकसभेच्या जागेसाठी इंडिया आघाडीकडून शिवसेनेचे (ठाकरे गट) माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते हे निवडणूक लढवणार असल्याचे जवळजवळ निश्चित झाले आहे. मात्र, भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये अद्यापही रस्सीखेच सुरु आहे. भाजपाला 2024 च्या निवडणुकीत 400 जागा जिंकायच्या आहेत. त्यानुसार त्यांनी तयारी केल्याचे भासवले जात आहे. राज्यात 45 जागा जिंकू असा दावा महायुती करत आहे. मात्र, इंडिया आघाडी भक्कम असल्याने महायुतीला 20-22 जगांवरच समाधान मानावे लागणार असल्याचे चित्र आहे.
राज्यातील जागावाटपांबाबत महायुतीमधील नेत्यांमध्ये सातत्याने तू-तू मै-मै पाहायला मिळत आहे. रायगड लोकसभेच्या जागेसाठी त्यांच्यामध्ये चांगलेच युद्ध भडकले आहे. भाजपाने या ठिकाणी धैर्यशील पाटील यांना उमेदवारी दिली आहे. तसे चित्र भाजपाकडूनच विविध सभांमधून अलीकडेच निर्माण केले जात आहे. या मतदारसंघात विद्यमान खासदार सुनील तटकरे आहेत. त्यांचा हक्क असताना भाजपाने आधीच धैर्यशील पाटील यांच्या रुपाने महायुतीत मिठाचा खडा टाकल्याची चर्चा आहे. भाजपाचे वरिष्ठ नेते हे सातत्याने विविध सभा-संमारंभातून खासदार तटकरेंना टार्गेट करत आहेत. पलटवार केला नाही, तर ते तटकरे कसले. तटकरेंनीदेखील आपल्या बाह्या सरसावत आपण मतदारसंघ सोडणार नसल्याचे ठणकावून सांगितले आहे. यासाठी त्यांनी थेट पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनाच मैदानात उतरवले आहे.
म्हसळा येथील सभेमध्ये अजित पवार यांनी तटकरे हेच महायुतीचे उमेदवार असतील आणि त्यासाठी महायुतीमधील सर्वांना काम करावे लागेल, असा सूचक इशारा दिला आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बोलणी झाली आहेत. फडणवीस यांनी मंत्री रवींद्र चव्हाण यांना सूचना दिल्या आहेत, तसेच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावळकुळे यांनीदेखील लक्ष घातले आहे. तुमच्या मनातीलच उमेदवार असेल, असेही पवार म्हणाले. त्यामुळे रायगड लोकसभेच्या उमेदवारीवरुन संघर्ष अटळ असल्याचे दिसते.
काहीच दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव ठाकरे यांचा कोकण दौरा पार पडला. त्यांनी जनतेशी साधलेल्या संवाद सभेत मुस्लिम समाजातील पदाधिकाऱ्यांसह सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती. कडवट हिंदुत्वाचा त्याग करुन त्यांनी राष्ट्रीयत्वाकडे वाटचाल केल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे मुस्लिम समाजासह अन्य अल्पसंख्याक समाजाला शिवसेना जवळची वाटत आहे. खासदार तटकरे यांना हेच खटकले असावे म्हणून त्यांनी म्हसळा येथेच सभा घेतली आणि मुस्लिम समाज आपल्यासोबत असल्याचे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे दक्षिण जिल्हाध्यक्ष अमिर खानजादा यांनी कृषीवलशी बोलताना तटकरेंवर निशाणा साधला आहे.
2019 च्या निवडणुकीत सुनील तटकरे हे शेकापच्या पाठिंब्यावर निवडून आले आहेत. आता परिस्थिती बदलली असून इंडिया आघाडीने शिवसेना ठाकरे गटाचे अनंत गीते यांना उमेदवारी दिली आहे. आज गीते यांचे पारडे जड आहे. त्यामुळे मतदार विद्यमान खासदार सुनील तटकरेंना घरी बसवतील. शेकाप सोडून भाजपात गेलेले धैर्यशील पाटील यांना भाजपाने खासदारकीच्या उमेदावारीचे गाजर दाखवले आहे.
पंडित पाटील, माजी आमदार, शेकाप
तटकरेंवर निशाणा
रायगड लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी धैर्यशील पाटील यांनीही दंड थोपटले आहेत. विद्यमान खासदारांनी पेण, सुधागड, माणगावच्या अफाट गर्दीचे भाजप मेळावे बघावेत, अशा शब्दात भाजपाकडून खासदार तटकरेंना विविध सभांमधून डिवचले जात आहे. 2019 च्या निवडणुकीत तटकरेंसोबत असलेले पाच आमदार आता त्यांच्या विरोधात असल्याचेही धैर्यशील पाटील यांनी म्हटलंय. एकूणच, विद्यमान खासदार म्हणत उमेदवारी मागण्याची परिस्थिती आता बदलली आहे, असे तटकरेंना भाजपाकडून सुनावण्यात आल्याने दोघांमध्ये विस्तव जात नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.