| अहमदनगर | वृत्तसंस्था |
अहमदनगर जिल्ह्यात एका एस टी बसच्या सीटखाली प्रवाशाला नोटांचा बंडल आढळून आल्याची घटना उघडकीस आली आहे. 500 रुपयांच्या नोटांचे दोन बंडल सापडल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील ही घटना असून एसटी आगार व पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे. या बसमधून प्रवास करणाऱ्या एका युवकाने मनाचा मोठेपणा आणि प्रामाणिकपणा जपत बसमधील वाहकाकडे नोटांचे हे दोन्ही बंडल सुपूर्द केले आहेत. मतदानाच्या दुसऱ्या दिवशी चक्क एस.टी बसमध्ये मोठी रक्कम मिळून आल्याने उलट सुलट चर्चेला उधाण आहे. तसेच, ही रक्कम नेमकी कोणाची आहे, कोणत्या कामासाठी ही रक्कम बसमधून नेण्यात येत होती, याचाही तपास करण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे मतदानच्या एक दिवस अगोदर, दोन दिवसांपूर्वी हीच बस स्ट्रॉंग रुमपासून ईव्हीएम आणि कर्मचाऱ्यांना घेऊन मतदान केंद्रावर गेली होती. त्यानंतर काल याच बसने कोपरगाव -वैजापूर-कोपरगाव अशा फेऱ्या केल्या आहेत. काल सायंकाळी कोपरगावहून धामोरीकडे जात असताना बसमधील एका विद्यार्थ्याला शेवटच्या सीटखाली नोटांचे दोन बंडल सापडले आहेत. या दोन्ही बंडलमधील नोटांची बेरीज केली असता तब्बल 86 हजारांची रोख रक्कम सापडल्याचे पाहायला मिळत आहे. एव्हढी मोठी रक्कम नेमकी कुणाची आणि बसच्या सीटखाली कशी आली? याबाबत पोलीस तपासात सर्वगोष्टी निष्पन्न होतील. सध्या बसमधील वाहकाकडून ही रक्कम संबंधित तपास यंत्रणेकडे देण्यात आली आहे.