। श्रीवर्धन । वार्ताहर ।
तालुक्यात नवीन ग्रामसेवकांची भरती होतं नसल्यामुळे 12 ग्रामसेवकांना 43 ग्रामपंचायतींचा भार सोसावा लागतं आहे.78 गाव असलेल्या तालुक्यात 05 ग्रामसेवक, 3 ग्रामसेवीका, 2 कंत्राटी ग्रामसेवक व 2 ग्रामविकास अधिकारी असे कार्यरत असुन प्रत्येक ग्रामसेवकास तीन ते चार ग्रामपंचायत सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागतं आहे.
ग्रामपंचायतीच्या सरपंचा बरोबर ग्रामसेवकास ही महत्त्वाची भूमिका बजावावी लागते. ग्रामपंचायत हद्दीतील रस्ते, जमिनी, इमारत, जागा यांचे मोजमापाचे दस्त ठेवणे, जन्म-मृत्यू दाखला, विवाह नोंदणी करणे, गावातील दारिद्रय रेषेखालील लोकांचे सर्वेक्षण करणे तसेच शासनाने सोपवलेली इतर कामे पार पाडणे ही कामे ग्रामसेवकांना करावी लागतात. 31 पदे मंजूर झालेली असुन सुद्धा 12 ग्रामसेवकांना प्रत्येकी तीन ते चार ग्रामपंचायतींचा कार्यभार दिलेला आहे. ग्रामसेवकांवर अतिरिक्त कार्यभार असल्यामुळे ग्रामसभा, मासिक सभा बोलावणे, सभेतील मुद्दयांवर अंमलबजावणी करणे ह्याचा ताळमेळ बसत नाही त्यातच काही दुर्गम गावांतून नेटवर्कची अडचण उद्भवल्यास ऑनलाईन सेवा ही खंडित होते. रिक्तजागांवर लवकरात लवकर नवीन नेमणुका करून ग्रामसेवकांवरील अतिरिक्त भाराचे ओझे कमी करावे जेणेकरून ग्रामसेवक आपल्या नियुक्ती केलेल्या ग्रामपंचायत कार्यालयात हजर राहून ग्रामस्थांचे प्रश्न, समस्या सोडवू शकतील.







