| तळा | वार्ताहर |
तळा तालुक्यातील बोरीचामाळ येथे झालेल्या घरफोडीचा अवघ्या 24 तासात छडा लावून तळा पोलिसांनी चोरट्याला अटक केली आहे. अंकित कृष्णा मिरगळ (26, गोरेगाव पूर्व मुंबई ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडे रोख रक्कमेसह घरफोडीतील मुद्देमाल देखील सापडला आहे. बोरीचामाळ येथील सावित्री सुभाष मिरगळ आणि धोंडू तुकाराम लटके हे मुंबईमध्ये वास्तव्यास आहेत. त्यांचे गावी येणे-जाणे कमी असते घरी कुणीच नसल्याने पाळत ठेवून मंगळवारी सायंकाळी गावात आलेल्या अज्ञात चोरट्याने घराच्या दरवाजाची कुलपे तोडून घरात प्रवेश केला व घरातील ऐवज चोरून नेला होता.
याबाबत सावित्री मिरगळ यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. फिर्याद दाखल होताच तळा सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला पोलिस हवालदार सुरेश पवार आणि संजय शिंदे यांनी घरफोडीचा कसून तपास करत असतानाच मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आरोपी अंकित कृष्णा मिरगळ यांस गोरेगाव मुंबई येथून अटक करून आणले व त्याच्याकडील गुन्ह्यातील 100 टक्के माल हस्तगत करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर घर बंद करून जाताना लोकांनी आपले दागिने, रोख रक्कम सोबत घेऊन जावे, असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी केले आहे.
बोरीचामाळ घरफोडीतील चोरट्याला अटक
