150 सीसीटीव्ही कॅमेरेद्वारा लागला छडा
| खोपोली | प्रतिनिधी |
शिळफाटा डिसी नगरमधील घरफोडीत लाखो रूपयांची सोने-चांदी चोरीच्या घटनेने खोपोली शहरात खळबळ उडाली होती. कोणताही पुरवा उपलब्ध नसतानाही पोलिसांनीही हे आव्हान स्विकारत जवळपास 150 सीसीटीव्ही कॅमेरे तपासून पुण्यातून तीन आरोपींना गजाआड केले आहे. या आरोपींनी गुन्ह्यांची कबूली दिल्यानंतर त्यांच्याकडून 17 तोळे सोने व 1250 ग्रॅम चांदी जप्त करण्यात आली आहे. त्यांना दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यातील आरोपी विशाल तांदळे (29) याच्यावर 27 गुन्हे, पप्पू देवकर (29) याच्यावर 3 गुन्हे, तर गणेश माळवे याच्यावर 1 गुन्हा वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विशाल तांदळे, पप्पू देवकर आणि गणेश माळवे यांनी रात्रीच्या वेळी खोपोलीतील डी.सी.नगरमधील जगदिश इंदरमल परमार यांच्या घरात चोरी केली. त्यांनी कपाटांतून एकूण 12 लाख 73 हजार रूपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरले होते. या चोरीचा शोध रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभीजीत शिवथरे, उपविभागिय पोलीस अधिकारी विशाल नेहूल, खोपोली पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलिस उपनिरिक्षक अभिजीत व्हरांबळे यांच्या पथकाने सुरु केला. यामध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासणी करण्यात आली. परंतु, कोणतीही माहिती मिळाली नाही. त्यानतंर या तपासामध्ये खोपोली, खालापुर, लोणावळा, खंडाळा, कोंढवा, कुसगांव टोलनाका व खालापूर टोलनाका परीसरातील सुमारे 150 सीसीटिव्ही कॅमेरांचे फुटेज तपासणी करण्यात आली. त्यामध्ये चोरट्यांनी स्वीप्ट डिझायर कारचा वापर केला असल्याचे निष्पन्न झाले आणि ही कार मुंबईकडे गेल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे विशाल दत्तात्रेय तांदळे याला मंचर पुणे पोलीस स्टेशन हद्दीतून, योगेश गोयकर याला कोंढवा येथुन, तसेच या गुन्ह्यांतील चोरीच्या सोन्याचे दागिने खरेदी करणारा गणेश चंद्रकांत माळवे याला यवत येथून ताब्यात घेण्यात आले. यांच्यासह गुन्ह्यात सहभागी असणारे उर्वरीत आरोपी शाहू कोकरे व महेश मंगळवेढेकर यांचा तपास सुरु आहे.







