| पनवेल | प्रतिनिधी |
खारघरमधील एका फ्लॅटमध्ये घरफोडी करणार्या सराईत आरोपीला अटक करण्यात खारघर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना यश आले. या आरोपीने तब्बल 1 लाख 5 हजार रुपये किमतीचे दागिने चोरी केले.
आकाश बालाजी गिरी (19) असे अटक आरोपीचे नाव असून, तो खारघर सेक्टर 15 परिसरातील राहणारा आहे. गॅलेक्सी करिना, सेक्टर 15 खारघर येथील डॉ. संदीप पिटके (42) यांच्या घरी चोरी झाल्याची घटना घडली होती. चोरट्यांनी कपाटातील सोन्याचे दागिने चोरून नेले. फिर्यादीच्या तक्रारीवरून खारघर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वर्षा काळे, प्रदीप आव्हाड, गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे फिरोज आग, प्रशांत जाधव, सूरज वायदंडे, वाजीत शेख, राहुल डावरे, सागर पाटील यांची चार पथके तयार करून घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईनै निरीक्षण करून त्याआधारे संशयित आरोपी निष्पन्न झाला. त्याचा शोध घेण्यासाठी अंदाजे 30 सीसीटीव्ही कॅमेरे तपासून आरोपीच्या ठिकाणी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.