। सांगोला । वार्ताहर ।
डोंगरगाव ता. सांगोला येथे अज्ञात चोरट्यानी बंद घराचे कुलूप तोडून सुमारे ४० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व १८ हजार रुपये रोख रक्कम असा एकूण ५८ हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरले असल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दिनांक २२ जुलै रोजी खतीजा हुसेन शेख रा. डोंगरगाव ता.सांगोला यांनी पोलीसात तक्रार दाखल केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी यांची तब्येत ठिक नसल्याने त्या दिनांक १७ जुलै रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घराला कुलूप लावून त्यांच्या मुलीकडे देवगाव ता. पंढरपूर येथे गेल्या होत्या. त्यानंतर २१ जुलै रोजी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास डोंगरगावातील नागरिकांनी फिर्यादी यांच्या राहत्या घराचा दरवाजा उघड असल्याची फिर्यादी यांना माहिती दिली.
त्यानंतर फिर्यादी गावी आल्या असता त्यांना घराचा दरवाजा उघडा आणि कडी-कोयडा तुटलेला दिसला.घरात जाऊन पाहिले असता घरातील कपाटातील ४८ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे नेकलेस, गंठन, गलसर, बोरमाळ, अंगठी, फुले झुमके व चांदिच्या पट्ट्या आणि १८ हजार रुपये रोख रक्कम दिसून आले नाही. सदरची घटना दिनांक १७ जुलै रोजी सकाळी दहा ते दिनांक २१ जुलै रोजी सकाळी साडे दहा वाजण्याच्या दरम्यान घडली असल्याचे फिर्यादीत सांगितले आहे.