पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ गावातील मुख्य बाजारपेठेत दुकाने फोडून चोरी करण्याच्या घटना घडल्या. एकाच रात्री पाच दुकाने फोडण्यात आल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तीन मेडिकल स्टोअर्स तसेच एक चपल बुटाचे आणि एक बियर शॉपी अशी पाच दुकाने फोडल्याने नेरळ पोलीस चक्रावले आहेत.
नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत 30 एप्रिल रोजी मध्यरात्री नेरळ बाजारपेठ भागातील 100 मीटर परिघातील चार दुकाने फोडून किरकोळ चोरी केली. नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील नेरळ बाजारपेठेतील अंबिका नाका आणि जुनी बाजारपेठ चार दुकान फोडून रोख रक्कम आणि इतर मुद्देमाल असा सुमारे 35 हजारांची रोकड लंपास केली. दोन ते अडीच वाजण्याच्या सुमाराच माथेरान नेरळ रस्त्यावरील तीन तर जुने बाजारपेठ भागातील एक अशी चार आणि नेरळ एसटी स्टँड भागातील एक मेडिकल स्टोअरमध्ये चोरीची घटना घडली. अंबिका भुवन नाक्याजवळील एमआरटी कॉम्प्लेक्समधील एका रांगेतील तीन दुकानांचा समावेश आहे.त्यात न्यू राज नावाचे वाईन आणि बियर शॉपमधील गल्ल्यातील पाच हजारांची रोकड तसेच बियर आणि वाईनच्या बाटल्या तसेच मोबाईल असा 25 हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. जीएन शूज शॉपमधून 100 रूपयांची चिल्लर तसेच तेथील केक शॉप फोडले, पण काहीही चोरीला गेले नाही.
नेरळमधील जुन्या बाजारपेठेतील डॉ लाड यांच्या क्लिनिकसमोरील अंबिका मेडिकल अँड जनरल स्टोअरमध्येही चोरी झाली असून, सहा हजार रुपये रोख आणि काही परफ्युम्स चोरून नेण्यात आले आहेत. या मेडिकल दुकानातील सीसीटीव्ही कॅमेर्यांमध्ये सदर चोरीची घटना कैद झाली असून, त्यानुसार पोलीस तपास सुरू आहे. तसेच या रात्रीमध्ये नेरळ पूर्व भागातील आणखी एक दुकानातही चोरी झाल्याचे समोर आले आहे. या सर्व चोरीच्या घटनांबाबत नेरळ पोलीस शोध घेत असून, अधिक तपास सुरू आहे.







