दागिने आणि इतर ऐवज लंपास
| महाड | प्रतिनिधी |
थंडीचा महिना सुरू होता महाडमध्ये प्रतिवर्षी होणार्या चोर्यांचे सत्र पुन्हा सुरू झाले आहे. नातेखिंडजवळील साई आशा या इमारतीमधील पाच फ्लॅट अज्ञात चोरांनी फोडून दागिने आणि रोख रक्कम लंपास केली आहे. याप्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
महाड शहर पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाड-रायगड मार्गावरील नातेखिंडजवळ असलेल्या साई आशा या इमारतीमध्ये शुक्रवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी इमारतीमधील सहा फ्लॅट फोडले. सहाही फ्लॅटमधील रहिवासी कामानिमित्त बाहेर गेले असल्याचा फायदा अज्ञात चोरट्यांनी घेऊन घरफोडी करत दागिने आणि रोख रक्कम लंपास केली आहे. याबाबत ज्यांची चोरी झाली त्या रहिवाशांनी महाड शहर पोलीस ठाण्यामध्ये रीतसर तक्रार नोंदवली आहे. या चोरी झालेल्या रहिवाशांमध्ये अस्मिता बळीराम महाडिक, प्रभाकर मालुसरे, प्रियांका भगत, अमित पवार, गणेश सुंभे, सुजाता सचिन गायकर यांचा समावेश आहे. याबाबत महाड शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखल झाला असून, तपास महाड शहर पोलीस करीत आहेत.