माणगावात घरफोडी: ६५ हजाराचा ऐवज लंपास

चोरटा पसार
। माणगाव । वार्ताहर ।
माणगावात घरफोडीचे धाडसत्र सुरूच असून अज्ञात चोरट्याने बंद घराच्या दाराचे कोणत्यातरी हत्याराने कांडीकोयंडा तोडून घरात प्रवेश करून रोख रक्कम ४५ हजार रुपये व सोन्याचे दागिने असा एकूण ६५ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून तो फरार झाला आहे. सदरची घटना दि. १३ मार्च २०२३ रोजी दुपारी १२ ते दि.२:३० वाजण्याच्या दरम्यान फिर्यादी यांच्या राहते घरामध्ये घडली.याबाबतची फिर्याद समीर सदानंद पयर (वय-३२) रा.साई नगर बिल्डिंग रूम नं. ३०२ तिसरा माळा, माणगाव यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.

सदर घटनेबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि,घटनेतील अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या राहते बंद घराच्या दाराचे कोणत्यातरी हत्याराने कांडीकोयंडा तोडून त्यावाटे घरात प्रवेश करून बेडरूम मधील कपाटात ठेवलेले फिर्यादी यांच्या मालकीची रोख रक्कम ५००, २००,१००,५० रुपये दराच्या नोटा किंमत ४५ हजार रुपये तसेच अंदाजित १० हजार रुपये किमतीचे फिर्यादी यांच्या मुलीच्या कानातील सोन्याचे २ रिंग प्रत्येकी २ ग्राम वजनाचे जुने वापरते, अंदाजित १० हजार रुपये किमतीचे फिर्यादी यांच्या मुलीच्या गळ्यातील २ सोन्याचे लॉकेट प्रत्येकी २ ग्राम वजनाचे जुने वापरते असा एकूण ६५ हजाराचा ऐवज चोरून तो फरार झाला आहे.

सदर गुन्हयाबाबत माणगाव पोलीस ठाण्यात कॉ.गु.रजि.नं.६६/२०२३ भादवि संहिता कलम ४५४,३८० प्रमाणे नोंद करण्यात येऊन अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. मोहिते हे करीत आहेत. दरम्यान घरफोडीच्या घटना जास्त करून उन्हाळ्यात दरवर्षी घडत असतात. सतत बंद घरांची होणारी घरफोडी याकडे नागरिकांनी लक्ष देऊन शक्यतो आपण घरातील सर्वजण एकाच वेळी बाहेर जाऊ नये.गेल्यास शेजाऱ्यांना घरावर लक्ष ठेवण्याची विनंती करावी किंवा एखादा सेक्युरिटी गार्ड यांना खास लक्ष ठेवण्यास सांगावे असे आवाहन माणगाव पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.

Exit mobile version