। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगाव नगरपंचायत हद्दीतील शिक्षक कॉलनी दत्तनगर भागात घरफोडी चोरी होऊन रोख रक्कम 15 हजार रुपये व सोन्याचे दागिने असे एकूण 75 हजार रुपयांचा ऐवज चोरून अज्ञात चोरट्यांनी पोबारा केला आहे. याबाबतची फिर्याद मंदार प्रेमशील मोरे (वय-38) रा. शिक्षक कॉलनी दत्तनगर माणगाव यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.
या गुन्ह्याबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि, घटनेतील अज्ञात चोरट्याने फिर्यादी मंदार मोरे यांच्या शिक्षक कॉलनी दत्तनगर माणगाव येथील घराच्या बंद दरवाज्याची कडी कापून दरवाजावाटे प्रवेश करून घरफोडी केली. यामध्ये 40 हजार रुपयाची एक सोन्याची चैन, 20 हजार रुपयाचे कानातले तसेच रोख रक्कम 15 हजार रुपये असा एकूण 75 हजार रुपयांचा ऐवज चोरून अज्ञात चोरटयांनी पोबारा केला आहे. या गुन्ह्याप्रकरणी अज्ञात चोरट्या इसमांवर माणगाव पोलीस ठाण्यात कॉ.गु.रजि.नं.170/2022 भादवि संहिता कलम 380, 454 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा अधिक तपास माणगाव पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गायकवाड हे करीत आहेत.






