पालीत भरवस्तीत घरफोड्या

बियर शॉपी व गोडाऊन फोडले
मोटारसायकल चोरली
पाली/बेणसे | प्रतिनिधी |

पाली पोलीस स्थानकापासून अवघ्या काही अंतरावर असलेले भरवस्तीतील घर, गोडाऊन फोडून चोरट्यांनी रोकड व साहित्य चोरून नेले आहे. तसेच एक बियर शॉपी मधील दारू रोख रक्कम चोरली आहे. एका दुचाकीचीही चोरी केली आहे.
संगीता शशिकांत पाशीलकर यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार पालीतील कासारआळीत राहणार्‍या संगीता पाशिलकर यांच्या घरी कोणी नसताना अज्ञात आरोपींनी त्यांच्या घराच्या खिडकी चे ग्रील तोडून घरात प्रवेश केला. आणि सर्व समान अस्ताव्यस्त करून घरातील चाळीस हजार रोख रक्कम चोरून नेली आहे. याशिवाय उन्हेरे येथील गौरी बियर शॉपीच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून येथील 14 हजार 460 रुपये किमतीचे चार बिअर बॉक्स व सहा हजार रुपये रोख रक्कम चोरट्यांनी पळवून नेली. तसेच तहसील कार्यालयाजवळील सम्राट सुपर मार्केटच्या गोडाऊनचे लोखंडी शटर उचकटून आत प्रवेश केला व तेथील ड्रॉव्हर मधील पाच हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली आहे. याबरोबरच बल्लाळेश्‍वर नगर येथील साजेकर चाळीमध्ये राहणारे मोलमजुरी करणारे संतोष यादव यांची घराबाहेर लावलेली वीस हजार रुपये किमतीची मोटरसायकल चोरट्यांनी पळवून नेली आहे. तपास पोलीस निरीक्षक विश्‍वजित काइंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार आर. एम. पवार व पोलीस हवालदार व्ही. जे. पाटील करत आहेत.

Exit mobile version