उरण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी

| उरण | वार्ताहर |

उरण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीच सत्र सुरू असून कळंबुसरे, चिरनेर या गावातील रहिवाशांच्या घरातील मौल्यवान सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम घेऊन चोरट्यांनी पोबारा केल्याची घटना घडली आहे. सदर घरफोड्या या मंगळवारी (दि.9) रात्रीच्या अंधारात घडल्या असून रहिवाशी भयभीत झाले आहेत.

उरण पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात परप्रांतीय फेरीवाल्यांनी आपले बस्तान बसवले आहे. तसेच अमली पदार्थ विक्रीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अशा अवैध धंद्यातून तरुण वर्ग चोरीच्या घटनाकडे वळत आहे. त्यामुळे चिरनेर, विंधणे, जासई, चिर्ले, धुतूम, बोकडविरा, नागाव सारख्या गावात या अगोदर मोठ्या प्रमाणात घरफोड्या होऊन रहिवाशांना चोरीच्या घटनातून आपले प्राण गमवावे लागले आहे. मंगळवारी रात्रीच्या सुमारास रहिवाशी झोपले असताना अंधाराचा फायदा उठवत चोरट्यांनी कळंबुसरे गावातील हेमंत नाईक, चंद्रशेखर राऊत, वसंत राऊत तसेच चिरनेर गावातील ठकुबाई ठाकूरसह इतर बंद घरातील दरवाजांच्या कडीकोयंडा तोडून कपाटातील सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन पोबारा केला आहे.

सदर घरफोड्या संदर्भात उरण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलीस यंत्रणेने तात्काळ घटना स्थळी धाव घेऊन पंचनामे सुरू केले आहेत. घरफोडीच्या घटना या सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याने पोलीस यंत्रणा चोरट्यांच्या मार्गावर लागले असल्याचे पोलीस सुत्रांकडून सांगण्यात येत आहे.

Exit mobile version