| माणगाव | प्रतिनिधी |
माणगाव तालुक्यातील कशेणे येथे घडफोडी झाल्याची घटना सोमवार दि.30 जून रोजी घडलेली आहे. या घरफोडीत चोरट्यांनी एकूण 1 लाख 66 हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला आहे. रायगड पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या आदेशाने व माणगाव उपविभागीय पोलीस अधिकारी पुष्कराज सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माणगाव तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गावरील कशेणे गावातील रवींद्र सायगावकर यांच्या घरफोडीची घटना घडली आहे. सोमवारी रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास रवींद्र सायगावकर यांच्या घराच्या मागील दरवाजाला धक्का मारुन दोन चोरट्यांनी घरामध्ये प्रवेश केला. चोरट्यांनी सायगावकर यांच्या बेडरुमला बाहेरुन कडी लावुन दुसऱ्या बेडरुममधील लोखंडी कपाटातून रोख रक्कम रुपये 6 हजार व सोन्याचे दागिने असा एकूण रुपये 1 लाख 66 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरुन नेला आहे. या घटनेची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास माणगावचे पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव हे करीत आहेत. तसेच, रायगड पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या आदेशाने व माणगाव उपविभागीय पोलीस अधिकारी पुष्कराज सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे अधिक गतिमान केली असून लवकरच या चोरट्यांचा छडा लावू, असा पोलिसांनी विश्वास व्यक्त केला आहे.






