चालकाच्या बेजबाबदारपणामुळे बसला अपघात

नऊ विद्यार्थी जखमी; सोशल मीडियामुळे चालकाविरूद्ध गुन्हा

| पोलादपूर | प्रतिनिधी |

पोलादपूर तालुक्यातील कुडपण येथून प्रवासी व विद्यार्थी घेऊन निघालेली एसटी बस क्षेत्रपाळ गावच्या हद्दीत आली असता खड्ड्यात आदळल्याने सात विद्यार्थी किरकोळ जखमी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली. यावेळी सोशल मीडियाद्वारे अनेकांनी बसचालकाविरूद्ध कारवाईची मागणी केल्यानुसार गुरूवारी उशिरा बसचालकाविरूद्ध पोलादपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

गुरूवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास कुडपण येथून पोलादपूरच्या दिशेने निघालेली बस (क्र.एमएच 20 बीएल 3775) चालक उध्दव रामचंद्र नलावडे हे चालवित होते. यावेळी बसमध्ये विद्यार्थी आणि प्रवासी असे एकूण 30 जण प्रवास करीत होते. यामध्ये गोळेगणी हायस्कूलची इयत्ता दहावीमधील विद्यार्थिनी रुपाली गंगाराम सोनावणे व वंदना पांडुरंग ढेबे, परसुले प्राथमिक शाळेतील इयत्ता पाचवीतील विद्यार्थिनी प्रतीक्षा संदीप मोरे, इयत्ता सातवीतील विद्यार्थी सोहम मंगेश मोरे, इयत्ता चौथीतील विद्यार्थी संतोष गंगाराम खुटेकर, करण भिवाजी सावंत, इयत्ता सातवीतील विद्यार्थिनी सायली संदीप मोरे, वैदेही लक्ष्मण खुटेकर व श्रेया सतीश मोरे आदी जखमी झाले.

जखमींना तात्काळ ग्रामीण रुग्णालय पोलादपूर येथे दाखल करण्यात येऊन उपचार सुरू करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलादपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्यासह स्वप्नील कदम, परेश मोरे, सुतार, संग्राम बामणे आदी पोलीस कर्मचार्‍यांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली.

यावेळी गटशिक्षणाधिकारी सुभाष साळुंखे, रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे, तालुकाप्रमुख निलेश अहिरे, प्राथमिक शाळांचे केंद्रप्रमुख मारुती कळंबे, कुडपणचे सरपंच अजय चिकणे यांनी पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात जखमींची भेट घेत विचारपूस केली आणि सोशल मिडीयातील युट्यूब वृत्तवाहिन्यांच्या मदतीने या अपघातातील एसटी बसचालक उध्दव रामचंद्र नलावडे यांच्याविरोधात कायदेशीर कारवाईची मागणी केली. या मागणीला यश येऊन गुरूवारी उशिरा बसचालक नलावडे याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सोशल मीडियामधूनच प्रसारित करण्यात आली असल्याने या अपघातप्रकरणी सोशल मीडिया प्रभावी ठरल्याचे चित्र तालुक्यात दिसून आले आहे.

Exit mobile version