। ठाणे । प्रतिनिधी ।
मुंबई-नाशिक महामार्गावर पडघा या गावाजवळ खासगी बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका 8 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 10 ते 12 जण जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींपैकी 3 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.
हा अपघात महामार्गावरील पडघा वडपे गावाजवळ घडला आहे. बसचालक अतीवेगात असल्याने त्याचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस थेट उड्डाणपुलाखालील बोगद्याला धडकली. अपघातावेळी बसमध्ये 20 प्रवासी होते. भिवंडीतील काही कुटुंबीय खडवली येथे पिकनिकसाठी गेले होते. मात्र, परत येताना रात्री त्यांच्या बसला अपघात झाला. यामध्ये एकाच कुटुंबातील 10 ते 12 जण जखमी झाले. तर 8 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. अपघातामध्ये जखमी झालेल्यांना भिवंडी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी तिघांची प्रकृती अतिशय गंभीर असल्याची माहिती मिळत असून याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे.






