प्रवासी वर्गासह बसचालकाची डोकेदुखी
| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
विविध कारणांनी कायम चर्चेत असलेले श्रीवर्धन आगार पुन्हा एकदा इंधन पुरवठा समस्येच्या कारणाने चर्चेत आला आहे. श्रीवर्धन आगारात एकिकडे इंधन बचाव अभियान सुरू असतानाच मुंबई व पुणे विभागात ये-जा करणाऱ्या एसटी बसेसना इंधनासाठी माणगाव आगारात जावे लागत आहे. आधिच लांब पल्ल्याच्या एसटी बसेसना अधिक थांबे देण्यात आले आहे. त्यातच माणगाव आगारात इंधन भरताना प्रचंड वेळ वाया जातो. याचा नाहक त्रास प्रवासी वर्गाला होत असून श्रीवर्धन आगारातील एसटी बसेसला मोठी डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे एसटी महामंडळाची इंधन बचाव मोहिम इंधनाअभावी कागदावरच राहिल्याचे प्रवासी वर्गातून बोलले जात आहे.
श्रीवर्धन स्थानकातून पहाटे 4 वाजल्यापासून रात्री साडेनऊ वाजेपर्यंत म्हसळा व बोर्लीपंचतन मार्गे मुंबई विभाग आणि काही एसटी बसेस पुणे विभागात मार्गस्थ होत असतात. त्याचप्रमाणे श्रीवर्धन-माणगाव अशा बसेसच्या फेऱ्या सुरू आहेत. श्रीवर्धन आगारातून मार्गस्थ होण्याअगोदर या सर्व एसटी बसेसमध्ये इंधन भरले जाते. मात्र, सद्यस्थितीत आगारातील इंधन पंप बंद अवस्थेत असल्याने श्रीवर्धन आगाराच्या बसेसना माणगाव आगारातून इंधन पुरवठा केला जात आहे. त्यामुळे लांब पल्ल्याच्या एसटी बसेस माणगाव आगारात इंधनासाठी थांबत असल्याने त्याचा नाहक त्रास प्रवासी वर्गाला सहन करावा लागत आहे.
इंधन भरण्याच्या प्रक्रियेला किमान 30 मिनिटे अवधी लागतो. त्यातही इंधनाकरीता पंपावर अगोदरच एखादी एसटी बस उभी असल्यास आणखी कालावधी लागत असल्याने बसचालकाला प्रवासी वर्गाच्या रोषाला सामोरे जावे लागते. श्रीवर्धन आगाराच्या मुंबई विभागात ये-जा करणाऱ्या बसेसना नागोठणे ते खारपाडा या मार्गावर अनेक थांबे दिले आहेत. त्यातच माणगाव आगारात इंधनासाठी वेळ जात असल्याने श्रीवर्धन आगारातून निघणाऱ्या एसटी बसेसची डोकेदुखी ठरत आहेत. श्रीवर्धन ते मुंबई हा प्रवास 5 तास 50 मिनिटांचा आहे. परंतु, सध्या हा प्रवास 7 तासांच्या वर झाला आहे.
इंधन बचाव अभियान कागदावरच
भविष्यात इंधन दरवाढीचे मोठे संकट समोर असताना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या चालकांना इंधन बचत अभियानातून डिझेल वाचविणे, पर्यायाने इंधनावरील अनावश्यक खर्च टाळण्याचे समुपदेशन करण्याबरोबरच पारंपरिक इंधनाच्या ज्वलनामुळे होणारे वातावरणातील प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने सुरक्षित व सुव्यवस्थित वाहन चालविण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या अभियान कालावधीत आगाराकडून ‘इंधन बचत करणाऱ्या चालकांचा सत्कार’ या अभियानांतर्गत करण्यात येणार आहे. परंतु, श्रीवर्धन आगाराचे ‘इंधन बचाव अभियान’ हे इंधन अभावी कागदावर राहिल्याचे चित्र आहे.
श्रीवर्धन आगारातील डिझेल पंपाचे काम सुरू आहे. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात माणगाव आगारातून डिझेल घेण्यात येत आहे. आगारातील सेवा लवकरच पुर्ववत होईल.
– महिबूब मणेर, श्रीवर्धन आगारप्रमुख
