| नवी मुंबई | प्रतिनिधी |
नवी मुंबईतील प्रतिष्ठित बांधकाम व्यावसायिक गुरनाथ चिंचकर यांनी स्वतः च्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना आज शुक्रवारी (दि.25) सकाळी घडली आहे. मुलगा अमली पदार्थ तस्करी रॅकेट मध्ये अडकल्याने त्यांनी नैराश्यपोटी आत्महत्या केली असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरनाथ चिंचकर हे किल्ला गावठाण येथे राहत होते. नेहमी प्रमाणे आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ते तळमजल्यावर आले. तेथील त्यांच्या कार्यालयात ते बसले व स्वतःच्या बंदूकतून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. ही बाब उघडकीस आल्यावर त्यांच्या पुतण्याने एन आर आय पोलिसांनी कळवले. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. आत्महत्या करण्यासाठी 9 M M गोळीच्या पिस्तूलाचा वापर करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी लिहलेली चिठ्ठी आढळून आली आहे. त्याचा मुलगा नवीन चिचकरवर नार्को टेस्ट विभागाच्या केसेस दाखल झाल्या आहेत. या विभागातील अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. मृतदेहाशेजारी सापडलेल्या चिठ्ठीत तसा उल्लेख करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, मृतदेहाशेजारी सापडलेल्या चिठ्ठीत आणखी कशाचा उल्लेख केला आहे का? याबाबतची माहिती मिळालेली नाही. या घटनेचा पोलिस अधिक तपास करत आहेत.