| पनवेल | प्रतिनिधी |
नाशिक येथील एकनाथ कडबाने यांची नाशिक ॲग्रो प्रॉडक्ट नावाची कंपनी आहे. ते गहू आणि पीठाची विक्री करतात. त्यांना धनजी भानुशाली यांनी मेसेज पाठवून पनवेल येथील उसरली खुर्द येथे त्यांची कंपनी असून, बारा टनाच्या गव्हाची आवश्यकता असल्याचे सांगितले. गव्हाचा प्रतिकिलो भाव 32 रुपये ठरवून गाडी पोहोचल्यानंतर ऑनलाइन पैसे देणार असल्याचे सांगितले. मात्र, एकनाथ यांना 14 सप्टेंबर रोजी धनजी भानुशाली यांनी गोडाऊनकडे जाणारा रस्ता बंद असल्याने ट्रक आसुडगाव येथील पेट्रोल पंपाजवळ पार्क करा, असे सांगितले. त्यानुसार त्यांनी त्या ठिकाणी गाडी उभी केली असता, भानुशाली यांच्या माणसांनी गाड्यांमध्ये गहू साठा भरून ते साई पॅलेस विचुंबे येथे नेले. दरम्यान, एकनाथ यांनी गव्हाच्या रकमेबाबत विचारले असता, भानुशाली यांनी तांत्रिक समस्येचे कारण देत ही रक्कम आज देऊ शकणार नसल्याचे सांगत आता धनादेश देतो, तो घेऊन उद्या माझ्याकडे या, मी तुम्हाला आरटीजीएस करून रक्कम पाठवतो, असे सांगितले. त्यानुसार एकनाथ कडबाने यांचे प्रतिनिधी 15 सप्टेंबर रोजी विचुंबे येथील गोडाऊनला गेले असता, धनजी भानुशाली तेथे नव्हता. तसेच, त्याचा मोबाईलही बंद असल्याचे समजले. त्यावर त्यांनी भानुशालीने दिलेला 3 लाख 84 हजारांचा चेक बँकेत जमा करण्यास गेले असता, त्यांच्या खात्यात पुरेशी रक्कम नसल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणात आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर एकनाथ यांनी खांदेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
व्यापाऱ्याला घातला लाखोंचा गंडा
