मुंबई । वृत्तसंस्था ।
कोरोना संकटामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या राज्यातील व्यापारी समाजाने आता पंतप्रधान मोदी यांच्याकडे धाव घेतली आहे. राज्यातील व्यापार्यांनी ट्रेडर्स ऑफ युनायटेड फ्रंटची स्थापना करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र पाठवले आहे. या पत्रात व्यापार्यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे आर्थिक दिलासा देण्याची मागणी केली आहे.
ज्या व्यापार्यांनी कर्ज घेतले आहे, त्यांना कोव्हिड काळातील 50 टक्के व्याज माफ व्हावे. तसेच 50 लाखांपेक्षा जास्तीच्या कर्जासाठी तीन महिन्यांचे व्याज माफ करा. लघू उद्योजकांना एसएमई युनिट जारी करावे आणि व्यापार्यांना जीएसटीचा परतावा द्यावा, अशा मागण्या या पत्रातून करण्यात आल्याचे एफआरटीएचे अध्यक्ष विरेन शाह यांनी सांगितले.
शहरातील कोरोना परिस्थिती आटोक्यात येऊन बरेच दिवस उलटल्यानंतही निर्बंध शिथील न झाल्यामुळे मुंबईतील व्यापारी वर्ग ठाकरे सरकारवर नाराज झाला आहे. ब्रेक द चेनच्या नियमावलीत मुंबईचा समावेश तातडीने दुसर्या स्तरात करावा. जेणेकरून व्यापार्यांना अधिक मोकळीक मिळेल, असे वक्तव्य एफआरटीएचे अध्यक्ष विरेन शाह यांनी म्हटले होते.
मुंबईतील कोरोना परिस्थिती ही पहिल्या टप्प्याची असताना शहरात तिसर्या स्तराचे निर्बंध का लागू आहेत, असा सवालही विरेन शाह यांनी विचारला. नवी मुंबई आणि ठाण्यात व्यापारावरील सर्व निर्बंध उठवण्यात आले आहेत. मात्र, मुंबईतील व्यापारी निर्बंधांमुळे खड्ड्यात जात आहे. हॉटेल व्यावसायिक आणि दुकानदारांचे हजारो कोटींचे नुकसान होत आहे, असेही विरेन शाह यांनी म्हटले होते.