आरोग्य कर्मचाऱ्यांची दिवाळी मात्र काळीच

| अलिबाग | प्रतिनिधी |

आपल्या मागण्यांसाठी अठरा दिवसांपासून कंत्राटी आरोग्य सेविका व आरोग्य सामुदायिक अधिकारी यांनी कामबंद आंदोलन सुरु केले आहे. मात्र आजही हे कर्मचारी उपेक्षित आहेत. सरकारच्या अनास्थेमुळे त्यांची दिवाळी मात्र काळीच होणार आहे.

रायगड जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या आरोग्य केंद्र व उपकेंद्रात सेवा देणाऱ्या आरोग्य सेविका व आरोग्य समुदाय अधिकारी कार्यरत आहेत.
राष्ट्रीय आरोग्य अभियान ( एनएचएम ) अंतर्गत शहरी, ग्रामीण व एनयुएचएम अंतर्गत कार्यरत तसेच एनएचएम कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावे व नियमित सेवेत घेतले जावे या त्यांच्या मुख्य मागण्या आहेत.

त्यासाठी जिल्ह्यातील 328 कर्मचाऱ्यांनी 25 ऑक्टोबरपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनात सुचिता पाटील, हेमलता पांडव, श्यामल साळुंखे, वैशाली नरवडे, मानसी कार्लेकर, डॉ. रुपेश सोनावळे, डॉ. राहुल थोरात यांच्यासह असंख्य कर्मचारी सामील झाले आहेत. गेल्या अठरा दिवसांपासून या कर्मचाऱ्यांचा लढा सुरु आहे. मात्र प्रशासन व सरकारकडून कोणत्याही प्रकारची सकारात्मक चर्चादेखील या कालावधीत झाली नाही. त्यामुळे हे आंदोलनकर्ते आजपर्यंत उपेक्षितच राहिले आहेत. दिवाळीपूर्वी हा प्रश्न मार्गी लागण्याची आशा होती. परंतु त्यांच्या प्रश्नांकडे बघण्यास सरकारकडे वेळ नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

कंत्राटी आरोग्य सेविका व आरोग्य सामुदायिक अधिकारी यांचे प्रश्न शासन स्तरावर आहेत. त्यांच्या आंदोलनामुळे आरोग्य सेवेवर काही प्रमाणात परिणाम झाला आहे. पर्याय म्हणून नियमीत सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने ग्रामीण भागात सेवा देण्याचा प्रयत्न सुरु आहे.

डॉ. मनीषा विखे पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग रायगड जिल्हा परिषद
Exit mobile version