सुप्रिया सुळेंची मोदी सरकावर टीका
| बीड | प्रतिनिधी |
इंडियाचे भारत होणार आहे आणि त्यासाठीच विशेष अधिवेशन बोलवले गेले आहे. या चर्चा अजूनही सुरु आहेत. तसेच भारतीय संविधानात इंडिया आणि भारत ही दोन्ही नाव कशी आली? यावरही बराच उहापोह सुरु आहे. या सगळ्या चर्चेत आता खासदार सुप्रिया सुळेंनी मोदी सरकारला हात जोडून विनंती केली आहे. आम्ही हवं तर भारत नाव ठेवतो पण जनतेच्या डोक्यावर 14 हजार कोटींचा बोजा टाकू नका असे टोला त्यांनी मोदी सरकावर हाणला आहे.
बीडच्या अंबाजोगाईत खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना नारायण दादा काळदाते स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी झालेल्या भाषणा दरम्यान सुळे यांनी शासन आपल्या दारी कार्यक्रमावरून राज्य सरकार तर भारत आणि इंडिया च्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला लक्ष्य केल. आम्ही आमच्या आघाडीला इंडिया नाव दिले. त्यामुळे आता जनतेच्या डोक्यावर 14 हजार कोटींचा बोजा येणार आहे. आम्ही इंडिया नाव दिले कारण हे चांगले नाव आहे. पण इतके घाबरले आमचे विरोधक की ते आता इंडियाचे भारत करणार आहेत. माझी भाजपाला हात जोडून विनंती आहे कि हवे तर आम्ही नाव भारत ठेवतो पण तुम्ही इंडिया नाव बदलून जनतेच्या डोक्यावर 14 हजार कोटींचा बोजा लादू नका असे सुळे यांनी म्हटले.
माझी भाजपाला विनंती आहे की 14 हजार कोटी हे आमच्या गरीब मायबाप जनतेचे आहेत. हे पैसे नाव बदलण्यासाठी खर्च करु नका. 14 हजार कोटींमध्ये सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी देता येईल. आजच्या अडचणीच्या काळात. 14 हजार कोटींमध्ये भारतात रुग्णालये बांधता येतील. 14 हजार कोटींमध्ये देशभरात शाळा उभारल्या जातील. 14 हजार कोटींचा खर्च नाव बदलण्यासाठी येणार आहे असे मी वर्तमानपत्रात वाचले आहे. त्यामुळे मोदी सरकारला आणि भाजपाला आवाहन करते की जनतेचे हे पैसे फक्त नाव बदलण्यासाठी खर्च करु नका.