नैवेद्यासाठी केळीच्या पानांची खरेदी

| पनवेल । वार्ताहर ।

गणेशोत्सव काळात केळीच्या पानांवर जेवणाची प्रथा आहे. उद्या सगळीकडेच गणरायाचे आगमन होणार असल्याने पनवेल आणि उरण येथील स्थानिक बाजारांमध्ये केळीची पाने विक्रीसाठी उपलब्ध झाली आहेत. परंतु यंदा केळीच्या पानांना देखील महागाईची झळ बसली असून 10 ते 15 रुपयांना मिळणारे पान आता अगदी 25 ते 30 रुपयांपर्यंत विकले जात आहे.

केळीच्या पानावर जेवणाला आयुर्वेदात वेगळे महत्त्व आहे. गणरायाला नैवेद्य दाखवण्यासाठी आणि आलेल्या पाहुण्यांना सात्विक जेवण देण्यासाठी गणेशोत्सवात केळीच्या पानांना अधिक मागणी असते. दक्षिण भारतात इतर वेळेसही केळीच्या पानांवर जेवले जाते. सध्या पनवेल येथील वडाच्या झाडाखालील जुन्या बाजारात तालुक्यातील गावांमधून मोठ्या प्रमाणात केळीची पाने विक्रीस उपलब्ध झाली आहेत. वाशी आणि पनवेल येथील कृषी उत्पन्न बाजारपेठेतही नाशिक, जळगाव आणि पुणे जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणात केळीची पाने आली आहेत. तसचे गणेशोत्सव काळात मागणी वाढत असल्याने दुर्गम भागातील डोंगर कपार्‍यात वाढणार्‍या रानटी केळीची पानेही विक्रीस आणली जात आहेत.

आयुर्वेदात विशेष महत्त्व
केळीच्या पानांमध्ये अँन्टीबॅक्टेरीयल गुण असल्याचे आयुर्वेदात सांगितले आहे. त्यामुळे या पानावर जेवण केल्यास डाग-खाज, पुरळ, फोड असे त्वचेच्या आजाराशी संबंधित असणारे त्रास कमी होतात. त्यामुळे केळीच्या पानावरील जेवण शरीरासाठी आरोग्यदायी असल्याचे दाखले आयुर्वेदात दिले गेले आहेत.

Exit mobile version