सत्तांतरासाठी आमदारांची खरेदी: प्रियंका गांधी

। लातूर । प्रतिनिधी ।

महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर आमदार विकत घेतले. तुमच्या डोळ्यादेखत निवडून आलेले सरकार पाडले. ज्या आमदारांना तुम्ही मत दिले, ते आमदार पक्षांतर करत आहेत. तुमच्या डोळ्यादेखत हा गुन्हा होत आहे. लोकशाहीची हत्या केली जात आहे. आपल्या पूर्वजांनी स्वतंत्र भारतासाठी, लोकशाहीसाठी लढा दिला. मात्र, आज लोकशाहीच दिसत नाही. संविधान बदलण्याची भाषा केली जात आहे. हे सरकार संधी मिळाल्यास हे संविधान बदलून टाकतील. संविधानाची ताकद कमी करतील. यासह इलेक्ट्रोल बाँडचा संदर्भ देत, मोदी सरकारने मोठा घोटाळा केल्याचे उदाहरणांसह सांगत प्रियंका गांधीं यांनी मोदी सरकारचा खरपूस समाचार घेतला.

मराठवाड्यात दुसर्‍या टप्प्यातील मतदान शुक्रवारी झाल्यानंतर लातूर आणि धाराशिवमध्ये 7 मे रोजी तिसर्‍या टप्प्यातील मतदान होणार आहे. या दोन्ही मतदारसंघात प्रचाराला वेग आला असून, राष्ट्रीय नेत्यांच्या सभांचा धडाका सुरू आहे. त्याच निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी कोल्हापुरात सभा घेत आहेत. दुसरीकडे काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांचीही शनिवारी (दि.27) उदगीरमध्ये सभा झाली. यावेळी त्या बोलत होत्या.

मोदींनी रोजगार दिला का, महागाई कमी केली का, असा सवाल प्रियंका गांधींनी उपस्थित केला. हाथरस, उन्नाव, मणिपूर आणि महिला कुस्तीपटूंचा दाखला देत महिलांवर होत असलेल्या अन्यायावरुन सवाल उपस्थित केले. देशात महिलांवर अत्याचार होत असून अत्याचार करणार्‍यांना पाठिशी घालण्यात येत असल्याचे प्रियंका गांधींनी म्हटले.

उद्योगपतींना कर्जमाफी, शेतकर्‍यांचं काय?
रोजगार, महागाई, महिलांसाठी विविध योजनांचा दाखला देत प्रियंका गांधींनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. मोदी सरकारने 16 लाख कोटी रुपयांची माफी बड्या उद्योगपतींना केली. मात्र, शेतकर्‍यांसाठी काय केले?, असा सवाल प्रियांका गांधींनी विचारला. देशात 70 कोटी युवक बेरोजगार असून 30 लाख जागा गेल्या 10 वर्षांत मोदींनी भरल्याच नाहीत. महागाईने सर्व महिला भगिनी त्रस्त झाल्या आहेत. गॅस सिलेंडर 1100 ते 1200 रुपयांवर पोहोचला होता. मात्र, निवडणुकी जवळ आल्या की सिलेंडरचे भाव कमी केले. महिलांसाठी सरकारकडून काहीही मिळत नाही, देशात किती शेतकर्‍यांनी आत्महत्या केली, सोयाबीनच्या शेतकर्‍यांचे काय हाल आहेत. शेतीच्या प्रत्येक मालावर जीएसटी लावण्यात येत आहे, असे म्हणत प्रियंका गांधींनी मोदी सरकावर हल्लाबोल केला.
Exit mobile version