12 जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

केंद्रीय निवडणूक आयोगाने 9 राज्यांमधील राज्यसभेच्या 12 जागांसाठी निवडणुका जाहीर केल्या आहेत. राजस्थान, हरियाणा, बिहार, आसाम, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, त्रिपुरा, तेलंगणा आणि ओरिसा या राज्यांतील 12 जागांवर निवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार 14 ऑगस्ट रोजी अधिसूचना जारी करण्यात येणार आहे, तर 21 ऑगस्ट हा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. 22 ऑगस्ट रोजी छाननी होणार आहे.

आसाम, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि त्रिपुरामध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 26 ऑगस्ट असेल तर बिहार, हरियाणा, राजस्थान, तेलंगणा आणि ओरिसामध्ये उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख 27 ऑगस्ट निश्‍चित करण्यात आली आहे. या सर्व जागांवर 3 सप्टेंबर रोजी मतदान होणार असून 3 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता निकाल जाहीर होणार आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातून उदयनराजे भोसले आणि पीयुष गोयल हे भाजपचे दोन राज्यसभा सदस्य निवडून आले होते. आता राज्यात त्यांच्या जागी पोट निवडणूक होईल.दरम्यान लोकसभेत निवडून गेलेले राज्यसभेतील दोन्ही खासदार भाजपचे होते. त्यामुळे महायुतीतून या दोन्ही जागा भाजपच लढवेल यात शंका नाही. मात्र महायुतीतील घटक पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी एखादी जागा मागतात का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.आता या निवडणुकीत उदयनराजे आणि पीयुष गोयल यांच्या जागेवर आपल्यालाच संधी मिळावी यासाठी ईच्छुकांनी काही दिवसांपासूनच फिल्डिंग लावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

दरम्यान पोटनिवडणुकीत या दोन्ही जागा भारतीय जनता पक्ष जिंकणार हे जवळपास नक्की आहे. कारण भाजपकडे विधानसभेत त्यांचे 106 आणि 15 अपक्ष असे 121 आमदार आहेत. यासह शिवसेना आणि राष्ट्रवादीचे सुमारे 90 आमदार आहेत. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होईल अशीही शक्यता आहे.

Exit mobile version