| पनवेल | प्रतिनिधी |
रॅपीडो ॲपवरून प्रवासी भाडे घेण्यासाठी गेलेल्या एका कॅबचालकाला चौघा लुटारूंनी बेदम मारहाण केली. तसेच, त्याचा मोबाईल हिसकावून खात्यातून फोन पेद्वारे जबरीने पैसे ट्रान्सफर केल्याची धक्कादायक घटना कळंबोली येथे घडली आहे. या घटनेतील पिडीत कॅबचालकाचे नाव अब्दुल कादीर इस्माईल केळकर (31) असून, हा मुंब्रा कौसा परिसरात राहण्यास आहे.
संध्याकाळच्या सुमारास तो रॅपीडो ॲपवरून आलेले भाडे घेण्यासाठी कळंबोली सेक्टर-17 येथील बालाजी इंटरनॅशनल स्कूलजवळ गेला होता. त्यावेळी मुंबई-कुलाबा मार्केट येथे जाण्याच्या बहाण्याने दोघे लुटारू अब्दूलकडे विचारणा करून त्याच्या कारमध्ये बसले. त्यानंतर त्यांचे इतर दोन साथीदार देखील कारमध्ये बसले. त्यानंतर या चौघांनी कॅबचालक अब्दुल याला मारहाण करून त्याचा मोबाईल हिसकावून घेतला. त्यानंतर त्यांनी अब्दुल्ला धमकावून त्याच्याकडून मोबाईलचा पासवर्ड आणि फोन पे ॲपचा पासवर्ड मागितला. मात्र, अब्दुलने त्यांना पासवर्ड देण्यास नकार दिल्याने चौघा लुटारूंनी दमदाटी केली. त्यानंतर जबरदस्तीने फोनपेचा पासवर्ड घेऊन त्याद्वारे त्याच्या मोबाईलवरून 5 हजार रूपये आपल्या खात्यात वळते करून घेतले. त्यानंतर लुटारूंनी पलायन केले. या घटनेनंतर कॅब चालकाने कळंबोली पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चौकडी विरोधात गुन्हा दाखल करून शोध सुरू केला आहे.