जयंत पाटलांमुळे मंत्रीमंडळ विस्तार रखडलेलाः शिरसाट

| मुंबई | वृत्तसंस्था |

राष्ट्रवादी कॉग्रेस (शरद पवार गट) नेते जयंत पाटील हे भाजपासोबत येणार असल्याने मंत्रिमंडळ विस्तार थांबला होता. भाजपासोबत जाण्याचा प्रस्तावच जयंत पाटील यांनी मांडला होता. आमदार आणि आपण सर्वसोबत जाऊन शरद पवारांना हे सांगू अशी चर्चा ही केली होती, असा गौप्यस्फोट शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केला. आजही पाटील हे शरीराने शरद पवारांसोबत आहेत. जयंत पाटलांना काही अडचणी आल्या असतील म्हणून ते तिकडेच थांबले आहेत, असेही ते म्हणाले. राम मंदिर हा भाजपाचा कार्यक्रम नाही. सर्व पक्षाचे कारसेवक तिथे होते. सर्व देशवासियांचा राम मंदिर उभारणीत वाटा आहे, असेही शिरसाट यांनी स्पष्ट केले.

विधानसभा निवडणुकीला आता अवघे 8-9 महिने राहिलेले असताना शिंदे सरकारमधील तीन तिघाडीमुळे मंत्रिमंडळ विस्तार रखडलेला आहे. बच्चू कडूंसारख्या आमदारांनी तर आता आशाच सोडून दिली आहे. मंत्रिपदासाठी संजय शिरसाट देखील शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून इच्छुक आहेत. परंतू, त्यानंतर विस्तार होऊनही शिरसाटांना मंत्रिपदाने हुलकावणी दिलेली आहे. दुसरा विस्तार होणार असे गेल्या काही महिन्यांपासून बोलले जात आहे. परंतु, विस्तार रखडलेलाच आहे. भाजपा, शिंदे गट आणि अजित पवार गट अशा तिघांना उरलेली मंत्रिपदे वाटून देण्यावरून तिढा सुटता सुटत नाही.
Exit mobile version