आरोग्य यंत्रणेचा निष्काळजीपणाचा कळस
| सुधागड-पाली | वार्ताहर |
सुधागड तालुक्यातील आपटवणे गावच्या हद्दीत असलेल्या ओहळात औषध गोळ्यांच्या हजारो पाकिटांचा खच टाकण्यात आला आहे. मंगळवारी (ता. 19) येथील सरपंच शरद चोरघे आणि ग्रामस्थांनी ही बाब निदर्शनास आणली आहे. आरोग्य यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.
ग्रामीण भागात रुग्णांवर उपचारासाठी सरकारमार्फत शासकीय रुग्णालयांना पुरविण्यात आलेल्या कॅल्शियम व गर्भनिरोधक गोळ्यांची ही पाकिटे आहेत. त्यांची योग्य विल्हेवाट न लावता अशा प्रकारे निष्काळजीपणे फेकून दिलेली आहेत. लहान मुले व जनावरे यांनी हे औषधे खाल्ल्यास त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. शिवाय, येथील पर्यावरणाला देखील हानी पोहोचू शकते. मागील वर्षी अशाच प्रकारे गाठेमाळ आदिवासी वाडीजवळ मुदत न संपलेल्या आयरन अँड फॉलिक अॅसिड सिरपच्या बाटल्या फेकण्यात आल्या होत्या.
एवढ्या मोठ्या प्रमाणात अशा प्रकारे औषधे टाकून देणे योग्य नाही. आरोग्य विभागाने औषधे गरजूंना देणे आवश्यक होते किंवा शास्त्रीय पद्धतीने त्यांची विल्हेवाट लावणे अपेक्षित होते. या प्रकरणाबाबत जे कोणी दोषी असतील, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी.
- शरद चोरघे, सरपंच, आपटवणे