| आगरदांडा | प्रतिनिधी |
प्रधान मंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग उन्नयन योजनेत कृषी वा बिगर कृषी क्षेत्रातील लाभार्थ्यांनी अर्ज करून लाभ घेण्याचे आवाहन राज्य शासनातर्फे करण्यात येत आहे. या योजनेमध्ये वैयक्तिक (महिला/पुरुष), स्वयं सहायता समूह, भागीदारी कंपनी, शेतकरी कंपनी, खासगी कंपनी, सहकारीसंस्था, गैर सहकारी संस्था आदी संस्था वा व्यक्ती सहभागी होऊ शकतात. यामध्ये नवीन किंवा अस्तित्वात असलेले सर्व प्रकारचे अन्न प्रक्रिया उद्योग यांचा समावेश आहे. या योजनेंतर्गत बँक व्याज दर वार्षिक 8 ते 12 टक्क्यांपर्यंत आकारले जाणार असुन नियमानुसार या योजनेअंतर्गत राष्ट्रीयकृत बँकेकडून कर्ज घेणे अनिवार्य आहे. ही कर्ज मुदत कमीतकमी 1 ते 10 वर्षे असून अनुदानाची मर्यादा मुदत कर्ज रक्कमेच्या 35 टक्के किंवा जास्तीत जास्त 10 लाख रुपयेपर्यंत असणार आहे. हा प्रकल्प चालू झाल्यानंतर 6 महिन्यांत अनुदान बँकेत जमा होईल. परंतु, 3 वर्षाचा कालावधी संपल्यानंतर त्याचा लाभ घेता येईल. व्यवसाय 3 वर्षा अगोदर बंद केल्यास किंवा बँक हफ्ते थकीत राहिल्यास अनुदानाचा लाभ भेटणार नाही याची नोंद घ्यावी. कर्ज योजनेस पात्र होण्यासाठी आवश्यक कागद पत्रांची प्रत जोडणे आवश्यक आहे. तरी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज सादर करण्याचे आवाहन शासनातर्फे करण्यात येत आहे.







