| आगरदांडा | प्रतिनिधी |
राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने माध्यमिक शाळेतील ग्रंथपाल हे गेले कित्येक वर्ष अर्धवेळ सेवेत कार्यरत होते. महाराष्ट्र राज्यातील माध्यमिक शाळेतील ग्रंथपाल पूर्ण वेळ होण्यासाठी एक हजार विद्यार्थी संख्येचे निकष कायम ठेवत कार्यरत शाळा व तीन शाळांची विद्यार्थी संख्या मिळून एक हजार विद्यार्थी संख्या पूर्ण करून अर्धवेळ ग्रंथपाल आता पूर्ण वेळ करण्यात येणार आहेत. यासाठी शिक्षण विभागाने 23 एप्रिल व 7 नोव्हेंबर रोजी शासकीय अध्यादेश पारित केले आहेत.
पूर्णवेळ करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील माध्यमिक शाळेतील सर्व ग्रंथपाल यांचे विशेष शिबीर अरुणकुमार वैद्य माध्यमिक शाळेत नुकतेच घेण्यात आले. यावेळी रायगड जिल्ह्यातील माध्यमिक शाळेतील सर्व ग्रंथपाल मोठ्या संख्येने उपस्थित होते. या विशेष शिबिरासाठी माध्यमिक शिक्षण अधिकारी जोत्स्ना शिंदे-पवार, माध्यमिक शिक्षण विभागाचे अधीक्षक वर्ग 2 सुभाष शिंदे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी सचिन ओव्हाळ, कनिष्ठ सहाय्य्क अमोल ठाकूर, अध्यक्ष निनाद ठाकूर, सचिव नरेंद्र पाटील, खजिनदार विशाल जगे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना कनिष्ठ प्रशासन अधिकारी सचिन ओव्हाळ यांनी सांगितले की, रायगड जिल्ह्यातील माध्यमिक शाळेत कार्यरत अर्धवेळ ग्रंथपाल यांना पूर्ण वेळ करण्यासाठीची प्रक्रिया सुरु करण्यात आली असून किमान एक महिन्याच्या आत सदरचे कामकाज पूर्ण करून लवकरच त्यांना पूर्णवेळचा दर्जा प्रदान करण्यात येईल, असे अभिवचन यावेळी त्यांनी दिले. शाळा मॅपिंगनुसार सदरची कार्यवाही लवकरच पूर्ण करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. सदरील शिबिरासाठी रायगड जिल्ह्यातील असंख्य ग्रंथपाल उपस्थित होते.







