पुण्यात प्रचाराची रणधुमाळी

| पुणे | प्रतिनिधी |

बारामतीच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे, पुण्याचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि शिरूरचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे, तसेच महायुतीच्या बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुनेत्रा पवार या गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यानिमित्ताने महायुती आणि महाविकास आघाडीकडून उमेदवारांसाठीच्या प्रचार सभा होणार असून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी दोन्ही बाजूंकडून करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, संपर्क प्रमुख सचिन आहिर यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची सभा होणार आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांची सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ सभा होणार आहे. या दोन्ही सभांमुळे महाविकास आघाडी आणि महायुतीच्या प्रचाराला खर्‍या अर्थाने प्रारंभ होणार असून पुढील काही दिवस प्रचाराची धार वाढणार आहे.

महाविकास आघाडी शहर आणि जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीचे उमेदवार रवींद्र धंगेकर, सुप्रिया सुळे आणि डॉ. अमोल कोल्हे गुरुवारी (दि.18) एप्रिल सकाळी साडेदहा वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला वंदन करून एकत्र येत निवडणूक अर्ज दाखल करणार आहेत. धंगेकर आणि कोल्हे जिल्हाधिकारी कार्यालयात तर, सुप्रिया सुळे विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात निवडणूक अर्ज दाखल करतील. यानंतर जवळच असलेल्या हॉटेल शांताईजवळ भव्य प्रचार सभा होणार असून तेथे तीनही उमेदवारांच्या प्रचारानिमित्ता शरद पवार यांची सभा होणार आहे.

Exit mobile version