प्रचार अडकला स्थानिक मुद्यांवरच

। चिपळूण । वृत्तसंस्था ।

जिल्ह्यामध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. देश व राज्यपातळीवरील प्रचाराचे पारंपरिक मुद्दे आता मागे पडत असून गद्दारी, लाडकी बहीण व स्थानिक पातळीवरील मुद्यांवर प्रचार सुरू आहे. गावच्या विकासासाठी किती निधी आणला आणि किती कार्यकर्त्यांना ठेकेदाराना कामे दिली यावर प्रचार सुरू आहे. निवडणुकीच्या निमित्ताने मतदारांचे मनोरंजनही केले जात आहे.

यापूर्वी होत असलेल्या निवडणुकांमध्ये पक्षाचे व उमेदवाराचे जाहीरनामे महत्त्वाची भूमिका बजावत होते. या जाहीरनाम्यामध्ये आपण कोणते प्रश्‍न सोडवणार आहोत, याचा प्रामुख्याने उल्लेख उमेदवार करायचे; परंतु आता जाहीरनामे ही कल्पना मागे पडत असून कार्यअहवाल हा नवीन प्रकार मतदारांमध्ये तसेच उमेदवारांमध्ये रूढ होत आहे.

आपण केलेल्या विकासकामांचा कार्य अहवाल उमेदवार मतदारांपुढे ठेवत आहेत. यामुळे स्थानिक व क्षुल्लक कामे आता प्रचाराचा मुद्दा ठरू लागली आहेत. रत्नागिरी जिल्ह्याचा विचार करता मुंबई-गोवा महामार्गाचा महत्त्वाचा प्रश्‍न अनेक वर्षे रखडलेला आहे. अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या आहे.

मूलभूत प्रश्‍न पडले मागे
जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये आरोग्य, शिक्षण, रोजगार हे मूलभूत प्रश्‍न कायम आहेत. सरकारी रिक्त पदांची समस्या सर्व ठिकाणी भेडसावत आहे. रखडलेल्या धरणांना न्याय देण्याची गरज आहे. औद्योगिक विकासही मंदावला आहे. शहरीकरणामुळे नवे नागरी प्रश्‍न निर्माण होत आहेत. या सर्व बाबींचा विचार गांभीर्याने होताना दिसत नाही. जिल्ह्याचा पर्यटन, कृषी विकास, प्रदूषणकारी कंपन्या वगळता औद्योगिक विकास, रोजगार, ग्रामस्थांचे रोजगारासाठी होणारे स्थलांतर थांबवणे असे मुद्दे प्रचाराकडे डोळे लावून बसले आहेत; पण प्रचार मात्र स्थानिक पातळीवर आणि गद्दारी, लाडकी बहीण अशा आरोप-प्रत्यारोपात अडकला आहे.
Exit mobile version