ऑलिम्पिकआधी 90 मीटर अंतर गाठू शकतो

नीरज चोप्राने व्यक्त केला विश्‍वास

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

सध्या माझी तयारी खूप चांगल्याप्रकारे सुरू आहे आणि या जोरावर आगामी पॅरिस ऑलिम्पिकच्या आधी कधीही मी 90 मीटर दूर भाला फेकू शकतो, असा विश्‍वास भारताचा गोल्डन बॉय भालाफेकपटू नीरज चोप्रा याने व्यक्त केला.

नीरजने 89.94 मीटरचा आपला वैयक्तिक सर्वोत्तम थ्रो 2022 साली स्टॉकहोम डायमंड लीगदरम्यान केला होता. नीरजने सराव सत्रामध्ये 90 मीटर अंतर गाठले आहे. मात्र, कोणत्याही स्पर्धेत त्याला या कामगिरीची पुनरावृत्ती करता आलेली नाही. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आपले सुवर्णपदक कायम राखण्याचा निर्धार केलेल्या नीरजने म्हटले की, ‘मी पॅरिस ऑलिम्पिकआधी 90 मीटर दूर भाला फेकण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. आशा आहे की, पॅरिस ऑलिम्पिकआधी ही कामगिरी करण्यात यश येईल. सध्या सर्वकाही सुरळीत सुरू आहे. त्यामुळे चाहत्यांना यासाठी पॅरिस ऑलिम्पिकपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार नाही. तयारी खूप चांगल्या प्रकारे सुरू आहे.’ नीरजने आपल्या तयारीबाबत सांगितले की, ‘सत्राच्या सुरुवातीला माझे लक्ष तंदुरुस्ती आणि मजबूत गोष्टींवर होते. यामध्ये मी भालाफेकीसाठी विशेष सराव केलेला नाही. माझ्या मते, याबाबत माझ्या तंत्रामध्ये बरीच सुधारणा झाली आहे. टोकियो ऑलिम्पिकमधील यशाने आत्मविश्‍वास उंचावला असून, याचा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खूप फायदा होईल. ही माझी दुसरी ऑलिम्पिक स्पर्धा ठरणार असून, मी मानसिक आणि शारीरिकरीत्या सज्ज आहे.’ जागतिक महासंघाचा निर्णय कौतुकास्पद! जागतिक अ‍ॅथलेटिक्स महासंघाने आगामी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ट्रॅक अँड फिल्डमध्ये सुवर्णपदक पटकावणार्‍या सर्व खेळाडूंना 50 हजार डॉलर पुरस्कार देण्याचे जाहीर केले आहे. महासंघाच्या या निर्णयाचे नीरजने कौतुक करत आभार मानले. त्याने सांगितले की, ‘फुटबॉल किंवा इतर खेळांच्या तुलनेत अ‍ॅथलेटिक्समध्ये आर्थिक फायदा खूप कमी आहे. त्यामुळे जागतिक अ‍ॅथलेटिक्स महासंघाने सुवर्ण विजेत्या खेळाडूंना आर्थिक पुरस्कार देण्याचा घेतलेला निर्णय खूप चांगला आणि कौतुकास्पद आहे. जागतिक अ‍ॅथलेटिक्स खूप सक्रिय होत आहे. माझ्या मते, भविष्यात डायमंड लीगसारख्या स्पर्धांमध्येही खेळाडूंना आर्थिक पारितोषिक मिळेल. असे झाल्यास खेळाडूंसाठी हे खूप चांगले होईल.’

Exit mobile version