नैना प्रकल्प रद्द करा

आ. जयंत पाटील यांची विधान परिषदेत मागणी


| अलिबाग | प्रतिनिधी |

नैना प्रकल्प शेतकरी विरोधी आहे. भांडवलदार, बिल्डरचे हित जपणारा प्रकल्प आहे. त्यामुळे स्थानिक शेतकरी देशोधडीला लागण्याची भीती आहे. मुख्यमंत्र्यांनी हा प्रश्न चर्चेद्वारे सोडवण्याचे आश्वासन दिले होते. शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून नैना प्रकल्प रद्द करा अशी मागणी आ. जयंत पाटील यांनी सभागृहात केली. विधानपरिषदेत अल्पकालीन चर्चेद्वारे पाटील यांनी सभागृहात आपली भूमिका मांडली.

विविध भागात प्रकल्प उभे करण्यासाठी शेतकऱ्यांकडून तुटपुंज्या किंमतीमध्ये जमिनी घेतल्या जात आहेत. त्या जमिनी उद्योग प्रकल्पासाठी आरक्षित केल्या जात आहेत. परंतु या जागेवर अद्यापर्यंत कोणतेही प्रकल्प, उद्योग सुरु केले जात नाहीत. असा आरोप करून पाटील यांनी त्या जमिनी शेतकऱ्यांना परत केल्या जात नाही. विदेशी कंपन्यांकडून गुंतवणूक करून स्थानिकांना रोजगार देण्याचे स्वप्न दाखविले जात आहेत. नैना, मुंबई उर्जा, टाटा पावर, यासारखे प्रकल्प शेतकऱ्यांच्या माथी मारून कवडीमोल भावाने जमिनी जबरदस्तीने संपादित केल्या जात आहेत. पेण तालुक्यातील सेझ प्रकल्पासाठी 45 गावांच्या जमिनी रिलायन्स कंपनीने शासनाकडून हस्तांतरित केल्या आहेत. परंतु त्या ठिकाणी कोणताही प्रकल्प उभारला नाही. त्या जमिनी शेतकऱ्यांना परत करण्याचे आश्वासन तत्कालीन उद्योगमंत्री यांनी सभागृहात दिले होते. मात्र त्याची कार्यवाही करण्यात आली नाही.

गेल्या अनेक महिन्यांपासून विविध प्रकल्पांच्या विरोधात प्रकल्पग्रस्तांनी त्यांच्या मागण्यांसाठी आंदोलने, मोर्चे काढले आहेत. परंतु याबाबत शासनाकडून कोणतीही दखल घेण्यात आली नाही.असा आरोप करून पाटील पुढे म्हणाले की, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन व रोजगाराचा प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहे. राज्य शासनाने त्यावर तातडीने उपाययोजना न केल्याने त्यांच्यामध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
नैना प्रकल्पाविरोधात शेतकरी आक्रमक आहेत. याबाबत मुख्यमंत्र्याना प्रत्यक्षात भेटलो. त्यांच्यासोबत चर्चा केली होती. मी शेतकऱ्यांच्या बाजूने आहे. नैना प्रकल्पाच्या बाबतीत असलेला प्रश्न चर्चेतून सोडवू असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यामुळे सरकार नैना प्रकल्प रद्द करेल अशी अपेक्षा जयंत पाटील यांनी शेवटी व्यक्त केली.

Exit mobile version