भूसंपादन मोबदलाप्रकरणी नामसदृश्य संस्थेची मान्यता रद्द

पंचक्रोशी संस्थेचे अध्यक्ष उमाजी निवाते अडचणीत

| पोलादपूर | प्रतिनिधी |

सर्वपरिचित श्रीगणेशनाथ महाराज संस्थानाच्या मालमत्तेबाबत काही वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या कायदेशीर अडचणी दूर होण्यास सुरूवात झाली आहे. श्रीगणेशनाथ महाराज संस्थान, तळवली पंचक्रोशी या नामसदृश्य नोंदणीकृत संस्थेची मान्यता रद्द झाल्याने भूसंपादन मोबदल्याची रक्कम शासनाची व न्यायालयाची दिशाभूल करून हडपल्याप्रकणी पंचक्रोशी संस्थेचे अध्यक्ष उमाजी निवाते अडचणीत आले आहेत.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर-कोलाडदरम्यान तळवलीतर्फे दिवाळी येथे श्रीगणेशनाथ महाराज संस्थानाच्या मंदिरासमोरील मोकळ्या जागेचे भूसंपादन झाल्यानंतर भूसंपादित जागेचे अंदाजे 9 लाख रूपये मोबदल्याची रक्कम म्हणून निश्‍चित झाली. ही रक्कम प्राप्त करण्यासाठी गणेशनाथ महाराज संस्थान, तळवली पंचक्रोशी ही धर्मादाय सहायक आयुक्तांना जाणीवपूर्वक अंधारात ठेवून नामसदृश्य नोंदणीकृत संस्था स्थापन करण्यात आली.

मात्र, मूळ श्रीगणेशनाथ महाराज संस्थान ही संस्था मुंबई येथील धर्मादाय आयुक्त यांच्याकडे स्थापन झाला असून, त्या संस्थानातर्फे अध्यक्ष अरविंद गणेश गोस्वामी तथा अरविंदनाथ महाराज यांनी संबंधित नामसदृश्य संस्थेच्या अध्यक्ष व विश्‍वस्तांविरूध्द हरकत घेतली. याप्रकरणी सहायक धर्मादाय आयुक्त अलिबाग आणि महाराष्ट्र राज्य धर्मादाय आयुक्त मुंबई रिव्हीजन यांचे निकाल श्रीगणेशनाथ महाराज संस्थान, तळवली पंचक्रोशी या संस्थेच्या विरोधात गेल्याने मूळ श्रीगणेशनाथ महाराज संस्थानचे विश्‍वस्त मंडळात असताना तळवली पंचक्रोशी संस्थेचे अध्यक्ष उमाजी निवाते यांनी या निकालाविरोधात उच्च न्यायालयामध्ये रिट पिटीशन दाखल केले.

याप्रकरणी जस्टीस गौरी गोडसे यांनी निकाल देताना गणेशनाथ महाराज संस्थान, तळवली पंचक्रोशी या नामसदृश्य नोंदणीकृत संस्थेची मान्यता रद्द केली आणि सदरप्रकरणी रिट पिटीशन दाखल करणार्‍या तळवली पंचक्रोशी संस्थेचे अध्यक्ष उमाजी निवाते यांना नव्याने अन्य नावाने संस्था स्थापन करण्याचा पर्याय खुला ठेवला. या आदेशानंतर मूळ मुंबई येथील धर्मादाय आयुक्त यांच्याकडे स्थापन झालेल्या गणेशनाथ महाराज संस्थानच्या तळवली येथील मंदिरासमोरील जमिनीचे भूसंपादन झाल्याचा मोबदला नामसदृश्य नोंदणीकृत संस्था गणेशनाथ महाराज संस्थान, तळवली पंचक्रोशी ए 1376 कडून दिलेली भूसंपादनाची रक्कम 7 लाख 98 हजार 183 रूपये आणि 1 लाख 27 हजार 480 रूपये दि. 23 जानेवारी 2024 रोजीचा मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालानुसार श्रीगणेशनाथ महाराज संस्थान ए-3512चे मुंबई अध्यक्ष अरविंद गणेश गोस्वामी यांच्या न्यासाला देण्यासंदर्भात सक्षम अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांच्याकडे अर्ज केला आहे.

गणेशनाथ महाराज संस्थान, तळवली पंचक्रोशी या संस्थेविरूध्द रोहा न्यायालयामध्ये फौजदारी प्रकरण क्रमांक 193-2017 दाखल असून, शिक्षा होण्यासाठी प्रलंबित असल्याचे श्रीगणेशनाथ महाराज संस्थान ए-3512चे मुंबई अध्यक्ष अरविंद गणेश गोस्वामी यांनी स्पष्ट केले आहे. बोगस नामसदृश्य असलेल्या गणेशनाथ महाराज संस्थान, तळवली पंचक्रोशी या संस्थेचे कायदेशीर अस्तित्व संपुष्टात आल्याने पंचक्रोशी संस्थेचे अध्यक्ष उमाजी निवाते यांच्याकडून सदरची रक्कम वसूल करून शासनजमा करीत श्रीगणेशनाथ महाराज संस्थान ए-3512चे मुंबई न्यासाला सुपूर्द करण्याचे पत्रात नमूद केले आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या गणेशनाथ महाराज संस्थान, तळवली पंचक्रोशी या नामसृदश्य संस्थेचे रिट पिटीशन निकाली काढण्याच्या निकालानंतर तळवली पंचक्रोशी संस्थेचे अध्यक्ष उमाजी निवाते यांच्या कायदेशीर अडचणींमध्ये वाढ होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

Exit mobile version