महाराष्ट्रावर कर्करोगाचं संकट

दररोज 333 रुग्ण आजाराने बाधित

| मुंबई | वृत्तसंस्था |

महाराष्ट्रात 2022 मध्ये दररोज सरासरी 333 कर्करोग रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात कर्करोगग्रस्तांची संख्या वर्षानुवर्षे वाढत आहे. आरोग्य विभागाच्या आकडेवारीचे विश्लेषण केल्यास उत्तर प्रदेशानंतर महाराष्ट्रात सर्वाधिक कर्करोगाच्या रुग्णांची नोंद झाली आहे.

घरातील एका व्यक्तीलाही कर्करोग झाल्यास अख्ख कुटुंब उद्ध्वस्त होते. कर्करोग कोणत्याही वयात आणि कोणत्याही कारणाने होऊ शकतो, पण बैठी जीवनशैली, व्यसन, बाहेरचे अन्न इत्यादी कर्करोगाचे कारण बनू शकते. इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही कर्करोगाची संख्या वाढत आहे. राष्ट्रीय कर्करोग नोंदणीनुसार 2013 मध्ये राज्यात 97,759 लोकांना कर्करोगाची लागण झाली होती. तर 2023 मध्ये 1,21,717 लोकांना कर्करोग झाला. वरील आकडेवारीवरून असे दिसून येते की गेल्या दशकात राज्यातील कर्करोगाच्या रुग्णांमध्ये 24 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

एशियन कॅन्सर इन्स्टिट्यूटचे संचालक पद्मश्री डॉ. रमाकांत देशपांडे म्हणाले की, कर्करोगाने ग्रस्त लोकांची संख्या दरवर्षी वाढत आहे, परंतु हे देखील वास्तव आहे की सर्व रुग्ण महाराष्ट्रातले नसून अनेक रुग्ण इतर राज्यातूनही येतात. कर्करोगासह वैद्यकीय उपचारांमध्ये महाराष्ट्र खूप प्रगत आहे. त्यामुळे रुग्ण बरे होतील या आशेने येतात.

कर्करोग प्रतिबंध
कर्करोग टाळण्यासाठी काही गोष्टी आपल्या हातात आहेत. धूम्रपान, तंबाखूयुक्त पदार्थांचे सेवन, दारूचे सेवन आणि बाहेरील अन्नावर जास्त अवलंबून राहणे यामुळे तोंड, घसा, फुफ्फुस, पोटाचा कर्करोग होऊ शकतो. म्हणूनच आपल्या सवयी बदलायला हव्यात. या सर्व गोष्टींचे सेवन न केल्याने आपण कर्करोग टाळू शकतो.

उपचारावर भर
मुंबईतील पालिका आणि महाराष्ट्रातील आरोग्य विभाग कर्करोग शोधण्याची आणि उपचारांची व्याप्ती वाढवत आहेत. मुंबईतील टाटा कर्करोग रुग्णालयाला व्यतिरिक्त, पालिका सायन आणि नायर रुग्णालयात देखील कर्करोग सेवा वाढवणार आहे. राज्य सरकारने नुकतीच एक बैठक घेतली, ज्यामध्ये प्राथमिक आरोग्य सेवा केंद्रांना कर्करोग तपासणी सुविधा देऊन त्यांना सक्षम करण्याबद्दल चर्चा झाली.

टाटामधील सुविधांचा विस्तार
खारघरमधील टाटा मेमोरियल रुग्णालयाचे एक्सट्रॅक्ट रुग्णालय 150 खाटांचे सुरू झाले. रुग्णांची वाढती संख्या पाहता रुग्णालयातील खाटांची क्षमता आता 500 करण्यात आली आहे. येत्या वर्षभरात ती 880 खाटांपर्यंत वाढवण्याची योजना आहे. याशिवाय हाफकिनमध्ये पुढील तीन वर्षांत 500 खाटांची क्षमता असलेली इमारतही तयार होणार आहे.

Exit mobile version