Cancer Screening Van: कर्करोगाचे निदान दारी

मोबाईल व्हॅनद्वारे जिल्ह्यात 25 ठिकाणी होणार शिबिरे

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

नागरिकांच्या राहणीमानात दिवसेंदिवस बदल होत आहे. त्याचा आरोग्यावर परिणाम होत आहे. कर्करोगाचे निदान करण्यासाठी आरोग्य विभागाने पाऊल उचलले आहे. रायगड जिल्ह्यात विशेष कर्करोग तपासणी व्हॅन सुरु करण्यात आली आहे. या व्हॅनच्या माध्यमातून दारीच कर्करोगाचे निदान होणार आहे. 2 ते 30 जुलै या कालावधीत विविध तालुक्यांतील 25 ठिकाणी मोफत तपासणी शिबिरांचे आयोजन या व्हॅनद्वारे करण्यात आले आहे.

रायगड जिल्ह्यातील नागरिकांना कर्करोगाचे लवकर निदान व वेळेत उपचार मिळावेत या उद्देशाने जुलै महिन्यात जिल्हाभर विशेष कर्करोग तपासणी व्हॅन फिरणार आहे. या विशेष मोहिमेंतर्गत पनवेल, कर्जत, खालापूर, सुधागड, तळा, माणगाव, पोलादपूर, महाड, रोहा, अलिबाग, पेण आणि उरण या तालुक्यांतील प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे व ग्रामीण रुग्णालयांमध्ये कर्करोग तपासणी शिबिरे भरविण्यात येणार आहेत. या शिबिरांमध्ये तज्ञ वैद्यकीय पथक नागरिकांची तपासणी करणार आहेत. आवश्यकतेनुसार पुढील उपचारांसाठी मार्गदर्शनही केले जाणार आहे. दोन जूलैपासून या मोहिमेला सुरुवात होणार आहे.

माणगाव महाड, तालुक्यात तीन, अलिबाग, पनवेल, कर्जत, खालापूर, तळा, पोलादपूर, रोहा, पेण या तालुक्यात दोन आणि सुधागड, उरणमध्ये एक वेळा व्हॅन फिरणार आहे. तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणारे, दीर्घकाळ तोंडातील जखमा, गाठी, स्तनांमध्ये बदल, असामान्य रक्तस्राव किंवा इतर संशयास्पद लक्षणे असलेल्या व्यक्तींनी तपासणीस प्राधान्य द्यावे, असे आरोग्य विभागाने आवाहन केले आहे. कर्करोगाचे सुरुवातीच्या टप्प्यात निदान झाल्यास उपचार अधिक प्रभावी ठरतात. त्यामुळे नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगता या शिबिरात सहभाग घ्यावा. जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी ही फिरती तपासणी व्हॅन महत्त्वाची ठरणार असून, 30 जुलैपर्यंत विविध गावांमध्ये नियोजित वेळापत्रकानुसार शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. नागरिकांनी आपल्या परिसरातील शिबिराच्या तारखेची माहिती स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा आशा सेविकांकडून घेऊन या मोफत तपासणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाने केले आहे.

या ठिकाणी असणार व्हॅन
तालुके - गावे
अलिबाग- रेवदंडा, खंडाळे.
पनवेल- वावेघर, वाजे.
कर्जत - खांडस, पिंगळ
खालापूर - चौक, खोपोली
सुधागड - नाडसूर
तळा - पन्हेली,मनदांड
तळा - पन्हेली
माणगाव - मोर्बा, मांजरवाणे, येलवडे
पोलादपूर - पिलटवाडी, सवद
महाड - भावे, करंजाडी, बीरवाडी
रोहा - मेढा, संभे
पेण - शिर्की, पेण
उरण - आवरे,
Exit mobile version