नगराध्यक्ष पदासाठी अक्षया नाईक यांचा अर्ज; नगरसेवक पदासाठी प्रशांत नाईक यांच्यासह वीस जणांनी भरले अर्ज
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबाग नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया शनिवारी राबविण्यात आली. शेकापसह महाविकास आघाडीकडून नगराध्यक्ष पदासाठी अक्षया नमिता प्रशांत नाईक यांनी, तर नगरसेवक पदासाठी प्रशांत नाईक यांच्यासह वीस जणांनी उमेदवारी अर्ज शनिवारी दाखल केले. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार विक्रम पाटील, मुख्याधिकारी सागर साळुंखे यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.

थेट नगराध्यक्ष पदासाठी अक्षया नाईक, नगरसेवक पदासाठी प्रभाग एकमधून संतोष मधुकर गुरव, संध्या शैलेश पालवणकर, प्रभाग दोनमधून सुषमा नित्यानंद पाटील, प्रशांत मधुसूदन नाईक, प्रभाग तीनमधून साक्षी गौतम पाटील, आनंद अशोक पाटील, प्रभाग चारमधून रेश्मा मनोहर थळे, महेश वसंत शिंदे, प्रभाग पाचमधून निवेदिता राजेंद्र वाघमारे, समीर मधुकर ठाकूर, प्रभाग सहामधून ऋषीकेश रमेश माळी, अश्विनी ठोसर, प्रभाग सातमधून ॲड. मानसी संतोष म्हात्रे, अभय म्हामुणकर, प्रभाग आठमधून ॲड. निलम किशोर हजारे, अनिल चोपडा, प्रभाग नऊमधून योजना प्रदीप पाटील, सागर शिवनाथ भगत, प्रभाग दहामधून शैला शेषनाथ भगत, वृषाली महेश भगत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी सर्व उमेदवार व कार्यकर्ते शेकाप भवन येथे जमले होते. दरम्यान, उमेदवारांनी शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील, अलिबागच्या माजी नगराध्यक्षा सुनिता नाईक, ज्येष्ठ नेते शंकरराव म्हात्रे, द्वारकानाथ नाईक, जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी सुप्रिया पाटील यांनी सर्व उमेदवारांचे औक्षण केले. शेतकरी भवनसमोर हातात लाल झेंडा घेऊन कार्यकर्त्यांनी गर्दी केली. एक वेगळा उत्साह कार्यकर्त्यांमध्ये दिसून आला. फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. दरम्यान, असंख्य कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने शेतकरी भवन येथे दाखल झाले होते. त्यांनी उमेदवारांना भेटून शुभेच्छा दिल्या. त्यानंतर दुपारी सर्व उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.
कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

अलिबाग नगरपरिषदेची निवडणूक प्रदीर्घ कालावधीनंतर होणार आहे. सध्या नगरपरिषदेवर राजकीय राजवट आहे. अक्षया नाईक यांच्या रुपाने महिलाराज येणार आहे. शनिवारी दुपारी अलिबाग नगरपरिषदेसमोर कार्यकर्त्यांनी गर्दी केली. अर्ज भरण्याचा दिवस असल्याने कार्यकर्ते हा क्षण डोळ्यात टिपण्यासाठी सकाळी नऊ वाजल्यापासून शेकाप भवनसमोर जमले होते. शहरातील कार्यकर्त्यांसह ग्रामीण भागातील कार्यकर्तेदेखील यामध्ये सहभागी झाले होते. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळा उत्साह दिसून आला.
शुभेच्छांचा वर्षाव

अलिबाग नगरपरिषदेच्या थेट नगराध्यक्ष पदासाठी अक्षया नाईक तसेच नगरसेवक पदासाठी प्रशांत नाईक यांच्यासह वीस जणांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे अक्षया नाईक यांच्यासह नगरसेवक पदाच्या उमेदवारांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांसह सर्व क्षेत्रातील मंडळींकडून शुभेच्छा देण्यात आल्य. यावेळी नव्या चेहऱ्यांना निवडणुकीत संधी देण्यात आली आहे.
राजकीय व सामाजिक वारसा असलेल्या अक्षया नाईक यांच्या रुपाने उच्च शिक्षित, समाज कार्याची आवड असणारा उमेदवार शेकाप, महाविकास आघाडीला मिळाला. नवे विचार, नवे व्हिजन घेऊन अक्षया नाईक राजकीय रिंगणात उतरल्या आहेत. अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या त्या धाकट्या कन्या आहेत. वडिलांकडून मिळालेला राजकीय, सामाजिक संस्कारांचा वारसा जनतेच्या हितासाठी जपण्याचे काम त्या करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.





