| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत नगरपरिषद निवडणुकीत 72.13 टक्के मतदान झाले असून मागील निवडणुकीपेक्षा यावेळी पाच टक्के मतदान जास्त झाले आहे. त्यामुळे हे वाढलेले मतदान अनेक उमेदवार यांना आशेचा किरण वाटत आहे तर काही उमेदवार संभ्रमात आहेत.
कर्जत नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी 29957 मतदार असून तेथे 21 सदस्य निवडण्यासाठी दहा प्रभाग बनविण्यात आले होते. प्रभाग दहा मध्ये तीन आणि उर्वरित नऊ प्रभागातून प्रत्येकी दोन सदस्य निवडले जाणार आहेत. पालिका निवडणुकीसाठी विविध 33 ठिकाणी मतदान केंद्र बनविण्यात आली होती. या सर्व मतदान केंद्रावर 21680 मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला.
कर्जत नगरपरिषदेमध्ये झालेले मतदान यामुळे महायुती आणि राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना ठाकरे पक्ष यांच्या कर्जत परिवर्तन आघाडीने दावे प्रतिदावे सुरू केले आहेत. एक वर्षापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजप आरपीआय युतीचे उमेदवार विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांना कर्जत शहरात 9400 मते मिळाली होती. त्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली नसल्याने अपक्ष म्हणून निवडणुकीला सामोरे सुधाकर घारे यांना 7900 तर तिसऱ्या क्रमांकावर राहिलेले शिवसेना ठाकरे पक्षाचे महाविकास आघाडीचे उमेदवार नितीन सावंत यांना केवळ 5800 मते मिळाली होती. या निवडणुकीत शिवसेना भाजप आरपीआय यांची महायुती कायम असून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे यांच्या कर्जत परिवर्तन आघाडीमध्ये महाविकास आघाडी मधील पक्ष एकत्र आले होते. विधानसभेला मतदारांनी आपल्या बाजूने साथ दिल्याचा दावा कर्जत परिवर्तन आघाडी करीत आहे.
विद्यमान आमदारांच्या बाजूने महायुतीची 9400 मते आहेत तर मग कर्जत परिवर्तन आघाडी कडे घारे आणि सावंत यांची मिळून साधारण साडे तीन हजार मते जास्त असल्याचे जाहीरपणे बोलत आहेत. विधानसभा निवडणुकीत 23 हजारहून अधिक मतदारांनी मतदान केले होते तर पालिका निवडणुकीत 21680 मतदार यांनी मतदान केले आहे.त्यामुळे कमी झालेले मतदान कोणत्या आघाडीला धोकादायक ठरते? याची गणिते मांडली जात आहेत.






