| पनवेल | प्रतिनिधी |
खारघर परिसरात भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार जगदीश घरत यांनी भारतीय जनता पक्षावर गंभीर आरोप केले आहेत. मतदारयादीतून त्यांच्या पत्नीचे नाव जाणीवपूर्वक वगळण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.
उमेदवार जगदीश घरत यांची पत्नी तेजस्विनी घरत या शेकापच्या रायगड जिल्हा महिला सरचिटणीस आहेत. खारघर-तळोजा परिसरातील पाणीटंचाईविरोधी आंदोलन, शहरातील दारूबंदी, बेकायदा अमली पदार्थ विक्रीविरोधात आणि विविध नागरी प्रश्नांवर त्यांनी सक्रिय भूमिका घेतल्यामुळे अल्पावधीतच त्या चर्चेत आल्या होत्या. जानेवारी महिन्यात अचानक त्यांचे नाव मतदारयादीतून वगळल्याचे निदर्शनास आल्याने घरत दाम्पत्याला धक्का बसला. नेमके नाव कसे वगळले यासाठी घरत यांनी पनवेल तहसीलदार, जिल्हाधिकारी ते राज्याचे निवडणूक आयोगापर्यंत दाद मागूनही त्या तक्रारीची दखल घेतली नाही. या निवडणुकीत तेजस्विनी या मतदानापासून वंचित राहणार आहेत.







