आठ गडी राखून दणदणीत विजय
। लखनऊ । वृत्तसंस्था ।
आयपीएलमध्ये मंगळवारी (दि.22) झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध दणदणीत विजय मिळवला आहे. लखनौच्या घरच्या मैदानात एकाना स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दिल्लीने 8 गडी राखत विजय मिळवला आहे.
या सामन्यात दिल्लीसमोर लखनौने विजयासाठी 160 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग दिल्लीने 17.5 षटकातच 2 गडी गमावत 161 धावा करून पूर्ण केला. या विजयात मुकेश कुमार, केएल राहुल, अभिषेक पोरेल आणि कर्णधार अक्षर पटेल यांचा मोठा वाटा राहिला. या सामन्यात दिल्लीकडून सलामीला अभिषेक पोरेल आणि करूण नायर उतरले होते. त्यांनी सुरुवातही चांगली केली. परंतु, चौथ्या षटकात नायर 15 धावांवर त्रिपळाचीत झाला. त्यांनतर पोरेलला केएल राहुलने चांगली साथ दिली. दोघांनी अर्धशतकी भागीदारीही पूर्ण केली. त्यामुळे दिल्लीसाठी विजय सोपा झाला होता. पोरेलने देखील अर्धशतक पूर्ण केले आणि 51 धावांवर बाद झाला. कर्णधार अक्षर पटेलने केएल राहुलला चांगली साथ दिली. अक्षरने आक्रमक खेळण्यावर भर दिला. त्यांच्यातही नाबाद अर्धशतकी भागीदारी झाली. यादरम्यान, केएल राहुलने आणखी एक अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर केएल राहुलनेच 18 व्या षटकात षटकार खेचत दिल्लीचा विजय निश्चित केला. केएल राहुल 57 धावांची, तर अक्षर पटेलने 34 धावांची नाबाद खेळी केली.
तत्पुर्वी, दिल्लीने नाणेफेक जिंकून लखनौला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले होते. लखनौने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 159 धावा केल्या. लखनौकडून एडेन मार्करमने 52 धावांची खेळी केली. मिचेल मार्शने 45 धावा केल्या. आयुष बडोनीने 36 धावा केल्या. याव्यतिरिक्त कोणाला खास काही करता आले नाही.दिल्लीकडून मुकेश कुमारने शानदार गोलंदाजी करताना सर्वाधिक 4 बळी घेतले. मिचेल स्टार्क आणि दुश्मंता चमिरा यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.
केएल राहुलची विक्रमी खेळी
दिल्लीच्या या विजयात केएल राहुलने अर्धशतक करत मोलाचा वाटा उचलला. त्याने दिल्लीसाठी विजयी षटकारही ठोकला. यासह त्याने एक नवा विक्रमही आयपीएलमध्ये रचला आहे. लखनऊने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना केएल राहुलने 42 चेंडूत 57 धावांची नाबाद खेळी केली. या खेळीत त्याने 3 चौकार आणि 3 षटकार मारले. त्याने या खेळीदरम्यान आयपीएलमध्ये 5 हजार धावाही पूर्ण केल्या आहेत. तसेच, हा टप्पा पार करणारा तो एकूण आठवा खेळाडू ठरला आहे. त्याने 139 सामन्यांमधील 130 डावांमध्ये 5006 धावा केल्या आहेत. त्यामुळे तो आयपीएलमध्ये सर्वात कमी डावात 5 हजार धावा करणारा फलंदाज ठरला आहे. केएल राहुलने विराट कोहली, डेव्हिड वॉर्नर, एबी डिविलियर्स यांसारख्या दिग्गज खेळाडूंना मागे टाकले आहे.







