उरणच्या खाडीपात्रांवर भांडवलदारांचा कब्जा

वसाहतीसाठी बेकायदेशीर इमारती
जेएनपीटी | वार्ताहर |
औद्योगिकीकरणात आघाडीवर असणार्‍या उरण तालुक्यातील खाडी, नदी पात्रांवर आता भांडवलदारांच्या अतिक्रमणाचे संकट आले आहे. उरण पूर्व भागातील खाडी पात्रांवर किसन राठोड नामक भांडवलदाराने बेकायदेशीर अतिक्रमाणांचा सपाटा लावला असून, त्याने खाडी पात्रांमध्ये वसाहतीसाठी बेकायदेशीर इमारती उभ्या करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, संबंधित शासकीय यंत्रणा त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.
उरण तालुक्याला खाड्यांचा प्रदेश म्हणूनही ओळखले जाते. अगदी डोंगरालगत असलेल्या या खाड्यांमधून डोंगर परिसरात पडलेले पावसाचे पाणी समुद्रापर्यंत वाहून नेण्याचे काम या परिसरातील नद्या, खाड्या करीत असतात. मात्र, या नैसर्गिक, नदी, खाडी पात्रांवर आता भांडवलदारांची वक्रदृष्टी पडली आहे. किसन राठोड नामक भांडवलदाराने लोकांना त्यांच्या स्वप्नातील घराचे आमिष दाखवून अनेक बोगस कंपन्या स्थापन करून या घरांच्या निर्मितीसाठी नदी, खाडीपात्रांवर अतिक्रमणाचा सपाटा लावला आहे. त्याने चिरनेर व विंधणे येथे शासकीय नियमांना ढाब्यावर बसवून खाडीकिनारी काही शेतजमीन खरेदी केली आहे. त्या जमिनीत व लगत असणार्‍या खाडीपात्रात त्याने मातीचा भराव करून जागा बळकावला आहेत.
या भांडवलदाराने खाडीपात्रात दगड मातीचा भराव केल्याने नदी, खाडीपात्र अरुंद झाल्याने चिरनेर गावात पावसाचे पाणी तुंबून जनतेची घरे जलमय झाली होती. तरी या अतिक्रमणावर चिरनेर ग्रामपंचायतीने कोणतीही कारवाई न केल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

उरण तालुक्यातील नदी, खाडीपात्रात अतिक्रमण करणार्‍या राठोडच्या या बेकायदेशीर धंद्याला जनतेने विरोध करण्याबरोबरच त्या त्या विभागातील ग्रामपंचायतींनी त्याला दिलेल्या बांधकाम परवानग्या काढून घेतल्या पाहिजेत. नाहीतर उरणच्या खाड्या भांडवलदार लवकरच गिळंकृत करतील, हे नक्की.
प्रशांत म्हात्रे, सामाजिक कार्यकर्ते

उरणच्या नदी, खाडी पात्रांमध्ये अतिक्रमण व बेकायदेशीर भराव झाले आहेत हे दिसून येत आहे. लवकरच त्याची योग्य ती चौकशी करून कारवाई करण्यात येईल.
भाऊसाहेब अंधारे, तहसीलदार-उरण

Exit mobile version