सहा जण गंभीर जखमी
। खोपोली । प्रतिनिधी ।
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर मंगळवारी (दि.30) दुपारी तीन वाजताच्या सुमारास मुंबई लेनवर खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत इर्टिका कारचा भीषण अपघात झाला. कुंभिवली गावाच्या हद्दीत कार आली असता चालकाचे नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून, सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.
याबाबत हकीकत अशी की, इर्टिका कार (एमएच-05-बीएस-4170) वरील चालक संदीप दिलीप बर्वे (48) रा. डोंबिवली-ठाणे हे त्यांच्या ताब्यातील कार पुणे येथून देवदर्शन करून डोंबिवलीकडे येत असताना हा अपघात झाला. अति वेगाने कार चालविल्याने चालकाचे कारवरील नियंत्रण सुटून ती महामार्गावरील डाव्या बाजूचे रेलिंग तोडून रस्त्याच्या खाली 50 फूट खड्ड्यात खाली पलटी झाली. या भीषण अपघातात मनीषा बर्वे (40) रा. डोंबिवली या जागीच ठार झाल्या, तर सोनाली बर्वे (35), दिवेश बर्वे (21) रा. डोंबिवली यांना गंभीर दुखापती झाल्याने एमजीएम हॉस्पिटल कामोठे येथे रवाना केले असता त्यांना डॉक्टरांनी मयत घोषित केले आहे.
या अपघातात सुमन बर्वे (68), चालक संदीप दिलीप बर्वे (48) यांना गंभीर दुखापत झाली असून, अश्वजीत बर्वे (13), प्रणव बर्वे (5), आदेश बर्वे (3), अनिकेत बर्वे (19), प्रिया बर्वे (18), गौरव बर्वे (17), कियारा बर्वे (6 महिने) सर्व रा. डोंबिवली, जि. ठाणे यांना किरकोळ स्वरूपाच्या दुखापती झाल्या असून, त्यांना पुढील उपचारासाठी एमजीएम हॉस्पिटल कामोठे येथे दाखल करण्यात आलेले आहे.
या अपघातातील वाहन रस्त्याच्या खाली असल्याने वाहतुकीला कुठल्याही प्रकारची बाधा झाली नाही. या ठिकाणी पोनि गौरी मोरे महामार्ग पोलीस पनवेल विभाग, खालापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी, म.पो.केंद्र पळस्पेचे अधिकारी व कर्मचारी, देवदूत टीम, आयआरबीकडील स्टाफ, अपघातग्रस्त मदत टीम, इतर वाहन चालक उपस्थित होते.